विद्युत खांब हटवण्यासाठी २४ कोटींचा प्रस्ताव
By admin | Published: February 3, 2015 12:40 AM2015-02-03T00:40:22+5:302015-02-03T00:40:22+5:30
विद्युत खांबांमुळे अकोला शहरातील रस्ते रुंदीकरणाला ब्रेक लागण्याची शक्यता.
आशिष गावंडे / अकोला: शहराच्या मुख्य २२ रस्त्यांवरील विद्युत खांब हटवण्यासाठी महावितरणने २४ कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार केला आहे. यामध्ये भूमिगत विद्युत वाहिनीचा समावेश राहणार आहे. महावितरणच्यावतीच्या मुख्य अभियंत्यांनी हा प्रस्ताव कंपनीच्या मुंबईतील मुख्य कार्यालयाकडे सादर केल्याची माहिती महावितरणच्या शहर विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत डामसे यांनी सोमवारी दिली. महावितरणकडून हा प्रस्ताविक राज्याच्या नगरविकास विभागाकडे सादर केला जाणार आहे. शहरातील मुख्य रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खड्डय़ांच्या समस्येला अकोलेकर अक्षरश: वैतागले आहेत. अतवृष्टीमुळे दुरवस्था झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी शासनाने दीड वर्षांपूर्वी महापालिकेला १५ कोटींचा निधी मंजूर केला. हा निधी मनपाकडे जमा असताना प्रशासन कागदी घोडे नाचविण्यात दंग आहे. १५ कोटींच्या निधीतून डांबरी १२, तर सिमेंट काँक्रीटच्या सहा रस्त्यांचे निर्माण होईल. यापूर्वी मनपा प्रशासनाने अनेकदा डांबरी रस्ते दुरुस्त केले; परंतु मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांवर विद्युत खांब कायम असल्याने रस्ता दुरुस्तीच्या कामासह वाहतुकीला होणारा अडथळा कायम आहे. मुख्य रस्त्यांलगत असलेले विद्युत खांब अपघातास कारणीभूत ठरतात. शिवाय रस्ता रुंदीकरण करताना मनपा प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागतो. यामधूनच महावितरणकडे मुख्य रस्त्यालगतचे विद्यूत खांब हटविण्याची मागणी सातत्याने मनपाने केली. त्यानुषंगाने महावितरणने शहरातील २२ रस्त्यांवरील विद्युत खांबांचे सर्वेक्षण केले. त्यानंतर विद्युत खांब हटवून भूमिगत वीज वाहिनी टाकण्यासाठी किमान २४ कोटींचा खर्च प्रस्तावित करण्यात आला. हा प्रस्ताव मुख्य अभियंत्यांनी ह्यप्रकाशगडह्णला सादर केला आहे. महावितरणकडून हा प्रस्ताव नगरविकास विभागाकडे सादर केला जाणार आहे. नगरविकास विभागाकडे प्रस्ताव सादर झाल्यानंतर हा विभाग प्रस्तावावर कोणता निर्णय घेतात त्यावरच पुढील भूमिका निश्चित होईल.