‘त्या’ मुख्याध्यापकासह शिक्षकांवर कारवाईचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 10:33 AM2019-08-21T10:33:28+5:302019-08-21T10:33:32+5:30
रेकॉर्डची तपासणी केल्याने त्यामध्ये दोषी आढळलेल्या मुख्याध्यापकावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शिकविण्याच्या परीक्षेत नापास झालेल्या शिक्षकांना सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा पाठ सादरीकरणाची संधी दिली जाणार आहे, तर रेकॉर्डची तपासणी केल्याने त्यामध्ये दोषी आढळलेल्या मुख्याध्यापकावर कारवाई होण्याची शक्यता आहे. त्याबाबतचा प्रस्ताव शिक्षण विभागाने मंगळवारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला. विशेष म्हणजे, त्या शिक्षकांवरील कारवाई रखडल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारीच प्रसिद्ध केले होते.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील १४ पैकी ११ शिक्षक शिकविण्याच्या गुणवत्तेत ‘ढ’ असल्याचे पुढे आले. सहा शिक्षकांना तर काठावर पास होण्याइतकेही गुण मिळाले नाहीत.
शिक्षक अध्यापन कार्यात किती सक्षम आहेत, याची पडताळणी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत शैक्षणिक गुणवत्ता वाढीच्या कार्यशाळेत करण्यात आली. त्यावेळी १४ शिक्षकांनी पाठाचे सादरीकरण केले. त्यामध्ये १० शिक्षकांना ५० पैकी २५ गुणही मिळाले नाहीत. सहा शिक्षक १७ गुणांचा टप्पा पार करू शकले नाहीत. या शिक्षकांवर कोणती कारवाई करावी, याबाबत सुरुवातीला गोंधळ होता. त्यानंतर प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी शिक्षण विभागाकडे कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे सांगितले. तेव्हापासून ही कारवाई थंड बस्त्यात होती. ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच शिक्षण विभागाने मंगळवारी प्रस्ताव सादर केला. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी संबंधित सात शिक्षकांना पाठ शिकविण्याची पुन्हा संधी देण्याचे सांगितले. त्यामध्ये जिल्हा परिषद शाळा पुनोती- अरुण गंगाराम राठोड, धोतरखेड- गोपाल लोखंडे, राजंदा- बिरसिंग डाबेराव, साईनगर- उद्धवराव देशमुख, वाकी- मोहन टेकाडे, सांगळूद- शारदा भरणे, खडका- विजय तायडे यांचा समावेश आहे. रेकॉर्डमध्ये घोळ असलेल्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार आहे. रेकॉर्डमध्ये घोळ असलेल्या पिंजर जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक हबीबोद्दीन मोइनोद्दीन, पिंप्री शाळेचे उमेश चोपडे, वडाळी सटवाई शाळेच्या अनिता देशमुख, कंझरा शाळेचे मेश्राम, सिरसो शाळेच्या लता मालवे, खैरखेडचे सुरेंद्र दिवनाले यांच्यापैकी कुणावर कारवाई होईल, हे लवकरच पुढे येणार आहे.
(प्रतिनिधी)