रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव दोन महिन्यांपासून प्रलंबितच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 05:10 PM2020-08-12T17:10:57+5:302020-08-12T17:11:47+5:30
गत दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावामुळे जीएमसीला रुग्णावाहिकेची प्रतीक्षा कायम आहे.
अकोला: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोपचार रुग्णालयाला दोन रुग्णवाहिका देण्याचे निर्देश आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. तसा प्रस्ताव देखील जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात आला होता. मात्र, अद्यापही रुग्णवाहिका खरेदी प्रलंबित आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयाकडे सद्यस्थितीत केवळ एकच रुग्णवाहिका आहे. अशातच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वोपचार रुग्णालयाला खासगी रुग्णवाहिकांवर अवलंबून राहावे लागत आहे. जिल्ह्यात मोठा शासकीय कार्यक्रम किंवा मंत्री आल्यास ही रुग्णवाहिका त्यांच्यासाठी राखीव ठेवली जाते. अशा परिस्थितीत सर्वोपचार रुग्णालयासाठी अतिरिक्त रुग्णवाहिकांची आवश्यकता आहे. मध्यंतरी आरोग्य मंत्री राजेश टोपे जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी सर्वोपचार रुग्णालयासाठी दोन रुग्णवाहिका देण्याचे निर्देश दिले होते. तसा प्रस्ताव देखील जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार, जिल्हा प्रशासनाकडे रुग्णवाहिका खरेदीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. मात्र, त्यानंतर या प्रस्तावावर कुठल्याच प्रकारची कार्यवाही झाल्याचे दिसून आले नाही. गत दोन महिन्यांपासून प्रलंबित असलेल्या प्रस्तावामुळे जीएमसीला रुग्णावाहिकेची प्रतीक्षा कायम आहे.