जिल्ह्यात नवीन ३०४ वर्गखोल्या बांधकामाचा प्रस्ताव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:16 AM2021-01-15T04:16:38+5:302021-01-15T04:16:38+5:30
अकोला : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या शिकस्त वर्गखोल्या पाडून नवीन वर्गखोल्या बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात नवीन ३०४ ...
अकोला : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या शिकस्त वर्गखोल्या पाडून नवीन वर्गखोल्या बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात नवीन ३०४ वर्गखोल्या बांधकामाचा प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे प्राप्त झाला असून, वर्गखोल्या बांधकामाचा प्रस्ताव लवकरच जिल्हा परिषदमार्फत जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या शिकस्त वर्गखोल्या पाडून नवीन वर्गखोल्या बांधकामासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या शिकस्त वर्गखोल्या पाडून नवीन वर्गखोल्या बांधकामांच्या विषयाला जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत १० डिसेंबर रोजी मंजुरी देण्यात आली. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यात जिल्हा परिषद शाळांच्या नवीन ३०४ वर्गखोल्या बांधकामांचा प्रस्ताव जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे प्राप्त झाला. नवीन वर्गखोल्या बांधकामांचा हा प्रस्ताव जिल्हा परिषदेमार्फत लवकरच जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे.
नवीन वर्गखोल्यांची अशी
आहेत प्रस्तावित कामे!
तालुका वर्गखोल्या
अकोला ९९
अकोला ५९
मूर्तिजापूर ६९
बार्शिटाकळी २६
तेल्हारा २२
बाळापूर १३
पातूर ०८
.............................................
एकूण ३०४
गरज ३२.२५ कोटींची;
मंजूर १३.५० कोटी रुपये!
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या नवीन ३०४ वर्गखोल्या बांधकामांसाठी ३२ कोटी २५ लाख रुपयांच्या निधीची गरज आहे. परंतु जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात नवीन वर्गखोल्या बांधकामांसाठी १३ कोटी ५० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. गरजेच्या तुलनेत मंजूर निधी कमी असल्याने, नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामांसाठी जिल्हा परिषदमार्फत अतिरिक्त निधी मागणीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या शिकस्त वर्गखोल्या पाडून नवीन ३०४ वर्गखोल्या बांधकामांचा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. वर्गखाल्या बांधकामासाठी ३२ कोटी २५ लाख रुपयांच्या निधीची गरज आहे. वर्गखोल्या बांधकामांचा प्रस्ताव लवकरच जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात येणार आहे.
- चंद्रशेखर पांडे गुरुजी,
सभापती, शिक्षण व बांधकाम, जिल्हा परिषद