सवलतीच्या गुणांसाठी प्रस्तावास मुदतवाढीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:32 PM2019-01-14T12:32:17+5:302019-01-14T12:32:37+5:30
अकोला : इयत्ता दहावीसाठी शास्त्रीय कला, चित्रकला, लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना सवलतीचे अतिरिक्त वाढीव गुण मिळण्यासाठी विभागीय बोर्डाकडे प्रस्ताव सादर करण्याला मुदतवाढ देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघ महामंडळाने शिक्षण विभागाकडे केली आहे.

शिक्षण विभागाच्या विविध विभागीय मंडळांनी प्रस्ताव सादर करण्यासाठी वेगवेगळी तारीख दिलेली आहे. काही मंडळांत २१ जानेवारी, काही ठिकाणी १५ जानेवारी ही तारीख दिली आहे. विशेष म्हणजे, सप्टेंबर २०१८ च्या चित्रकला (ड्रॉइंग) ग्रेड परीक्षेचा निकाल कला संचालनालय, मुंबई यांच्याकडून १४ जानेवारी रोजी जाहीर केल्या जात आहे. या परिस्थितीत काही केंद्रांपर्यंत पोस्टाने पाठविलेले निकाल पत्रक पोहोचू शकत नाहीत. त्यानंतर केंद्र प्रमुखांना सहभागी शाळांना निकाल कॉपी करून पाठवायचा असतो. त्यासाठी निदान दोन-तीन दिवसांचा कालावधी लागतो. त्यामध्ये सध्या दहावीत शिकत असलेले विद्यार्थी इंटरमिजिएट ग्रेड परीक्षेला बसलेले आहेत. त्यांनी मागील वर्षी इयत्ता नववीत असताना एलिमेंट्री ड्रॉइंग ग्रेड परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. त्या विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता त्यांचे प्रस्ताव बोर्डाकडे सादर करण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राज्य कलाध्यापक संघ महामंडळ राज्याध्यक्ष पी. आर. पाटील, सचिव एम. ए. कादरी व प्रसिद्धिप्रमुख किशोर आंबेकर यांनी केली आहे.