अकोला शहरातील 'जनता कर्फ्यू ' चा प्रस्ताव मुख्यसचिवांकडे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2020 04:47 PM2020-05-29T16:47:25+5:302020-05-29T16:47:37+5:30
'जनता कर्फ्यू ' चा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शुक्रवारी राज्य शासनाच्या मुख्यसचिवांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला.
अकोला : कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग करण्यासाठी १ ते ६ जून या सहा दिवसांच्या कालावधीत अकोला शहरात ' जनता कर्फ्यू ' पाळण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी गुरुवारी घोषित केले . त्यानुषंगाने शहरातील 'जनता कर्फ्यू ' चा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत शुक्रवारी राज्य शासनाच्या मुख्यसचिवांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला.
अकोला शहरात कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि कोरोनाबाधित 'पॉझिटिव्ह ' रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता , शहरातील वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या पृष्ठभूमीवर २८ मे रोजी पालकमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात लोकप्रतिनिधींसह सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. शहरातील कोरोना विषाणूंचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी १ ते ६ जून या सहा दिवसांच्या कालावधीत अकोला शहरात 'जनता कर्फ्यू ' पाळण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याची घोषणा पालकमंत्र्यांनी केली. दरम्यान , कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'लॉकडाऊन' च्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना गत १९ मे रोजी राज्य शासनामार्फत जाहीर करण्यात आल्या असून , त्यानुसार शासनाच्या मार्गदर्शक सूचनाव्यतिरिक्त कुठल्याही जिल्हा अथवा महापालिका प्रशासनाला मुख्य सचिवांच्या मान्यतेशिवाय स्वतंत्र आदेश काढता येणार नाहीत. त्यानुषंगाने अकोला शहरातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी शहरात १ ते ६ जून असे सहा दिवस 'जनता कर्फ्यू ' पाळण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला असून , जनता कर्फ्यू पाळण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य शासनाच्या मुख्य सचिवांकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे.
-कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग नियंत्रित करण्यासाठी अकोला शहरात १ ते ६ जून सहा दिवस 'जनता कर्फ्यू ' पाळण्याचा निर्णय सर्वपक्षीय बैठकीत घेण्यात आला असून , त्यानुसार जनता कर्फ्यू पाळण्यात मान्यता देण्यात यावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्य सचिवांकडे पाठविण्यात आला आहे.
-संजय खडसे
निवासी उपजिल्हाधिकारी