अकोला शहरातील स्वच्छतागृहांचा प्रस्ताव कागदावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 10:18 AM2019-08-21T10:18:44+5:302019-08-21T10:18:49+5:30
जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर स्वच्छतागृह उभारण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने महापौर अग्रवाल यांनी स्वत: सदर प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर केला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहरातील बाजारपेठ, गर्दीच्या जागा तसेच सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्यासाठी महापालिका प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी दहा जागांचा प्रस्ताव तयार केला. या प्रस्तावाला जिल्हा प्रशासनाने मान्यता द्यावी, यासाठी महापौर विजय अग्रवाल यांनी सुरुवातीला पाठपुरावा केला.
मागील वर्षभरापासून हा प्रस्ताव महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या लालफीतशाहीत अडकला आहे. मोठमोठ्या विकास कामांचा गवगवा करणाऱ्या सत्ताधारी भाजपचे सर्वसामान्यांना भेडसावणाºया समस्यांकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसह प्रशासकीय कामकाजानिमित्त बाहेरगावच्या नागरिकांची सतत वर्दळ असते. शहरात स्वच्छतागृहांची वानवा असल्यामुळे नागरिकांना नाइलाजाने खुल्या जागा, शासकीय आवारभिंतीलगतच्या जागेचा वापर करावा लागत असल्याचे चित्र आहे. शहराच्या मध्यभागी मुख्य बाजारपेठ वसली असून, पुरुष आणि महिलांची कुचंबणा टाळण्यासाठी या भागात स्वतंत्र स्वच्छतागृहांची उभारणी आवश्यक आहे.
सद्यस्थितीत बोटावर मोजता येणाºया; परंतु दृष्टीस न पडणाºया स्वच्छतागृहांमुळे नागरिकांची कुचंबणा होत आहे. दोन वर्षांपूर्वी मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने शहरात सात ते आठ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आले; परंतु सदर स्वच्छतागृहांची देखभाल ठेवल्या जात नसल्याने त्या ठिकाणी घाण व दुर्गंधीचे साम्राज्य आहे. शासनाच्या ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत नागरिकांसाठी मोक्याच्या ठिकाणी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुषंगाने महापौर विजय अग्रवाल यांनी मुख्य बाजारपेठसह शहराच्या इतरही भागात मोक्याच्या ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश नगररचना विभागाला दिले होते.
या विभागाने पहिल्या टप्प्यात दहा जागा निश्चित केल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर स्वच्छतागृह उभारण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने महापौर अग्रवाल यांनी स्वत: सदर प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर केला होता. त्यानंतर हा प्रस्ताव रखडल्याचे समोर आले आहे.
या ठिकाणी स्वच्छतागृह प्रस्तावित
- दुर्गा चौकातील मुख्य नाला
- जवाहर नगर चौक
- सिव्हिल लाइन चौक (जि. प. सर्किट हाउस)
- सिटी कोतवाली चौक, हायड्रंटजवळ
- कोठडी बाजार, मुख्य नाल्याजवळ
- जुना धान्य बाजार
- गांधी चौक, जैन मंदिरालगत
- टिळक रोड, आकार डेव्हलपर्सजवळ
- जयहिंद चौक, जि. प. उर्दू शाळेचे आवार
- मंगरूळपीर रोड, क्लासिक बारजवळील नाला.