६४ खेडी पाणीपुरवठा योजना कंत्राटी पद्धतीने चालविण्यासाठी तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2021 11:03 AM2021-01-11T11:03:34+5:302021-01-11T11:05:23+5:30
Akola News हा प्रस्ताव ११ जानेवारी रोजी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत मजीप्राच्या कार्यकारी अभियंत्यांकडे पाठविण्यात येणार आहे.
अकोला : खार पाणपट्यातील ६४ खेडी खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कंत्राटी पद्धतीने चालविण्यासाठी तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, हा प्रस्ताव सोमवारी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत महाराष्ट्र जीवन प्राधीकरणकडे (मजीप्रा) तांत्रिक मान्यतेसाठी पाठविण्यात येणार आहे.
अकोला तालुक्यातील खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत ६४ गावांना महान येथील काटेपूर्णा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. ६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कंत्राटी पद्धतीने चालविण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात येत असल्याचा ठराव १० डिसेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. त्यानुसार ही योजना कंत्राटी पद्धतीने चालविण्यासाठी तांत्रिक मान्यतेचा प्रस्ताव जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत तयार करण्यात आला असून, तांत्रिक मान्यतेसाठी हा प्रस्ताव ११ जानेवारी रोजी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत मजीप्राच्या कार्यकारी अभियंत्यांकडे पाठविण्यात येणार आहे.
आचारसंहिता संपल्यानंतर राबविणार निविदा प्रक्रिया !
६४ खेडी प्रादेशिक पाणीपुरवठा कंत्राटी पद्धतीने चालविण्यासाठी मजीप्राकडून तांत्रिक मान्यता प्राप्त झाल्यानंतर तसेच ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची आचार संहिता संपल्यानंतर पाणीपुरवठा योजना कंत्राटी पद्धतीने चालविण्यासाठी जिल्हा परिषदमार्फत निविदाप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
योजनेच्या पुनरुज्जीवनासाठी ६० कोटींचा प्रस्ताव शासनाकडे !
६४ खेडी खांबोरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेंतर्गत जलवाहिनी शिकस्त झाली आहे. तसेच योजनेंतर्गत गावांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर या पाणीपुरवठा योजनेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी ६० कोटी रुपयांच्या योजनेचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधीकरणमार्फत शासनाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.