अकोला महापालिकेचा अत्याधुनिक स्वच्छतागृहांसाठी प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:38 PM2018-07-27T12:38:04+5:302018-07-27T12:41:29+5:30
अकोला : बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्याची गरज ध्यानात घेता महापालिका प्रशासनाने दहा जागांचा प्रस्ताव तयार केला.
अकोला : बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणी नागरिकांसाठी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्याची गरज ध्यानात घेता महापालिका प्रशासनाने दहा जागांचा प्रस्ताव तयार केला. महापौर विजय अग्रवाल यांनी सदर प्रस्ताव जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे सादर केला असून, त्याला मंजुरी मिळताच आणखी दहा जागांचा प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेत विविध साहित्य खरेदीसह प्रशासकीय कामकाजानिमित्त बाहेरगावच्या नागरिकांची सतत वर्दळ असते. शहरात स्वच्छतागृहांची वानवा असल्यामुळे नागरिक नाईलाजाने उघड्यावर कार्यभाग आटोपत असल्याचे दिसून येते.
शहराच्या मध्यभागी मुख्य बाजारपेठ वसली असून, साहजिकच पुरुष आणि महिलांची कुचंबणा टाळण्यासाठी या भागात स्वतंत्र स्वच्छतागृहांची व्यवस्था क्रमप्राप्त ठरते. सद्यस्थितीत बोटावर मोजता येणाºया परंतु दृष्टीस न पडणाºया स्वच्छतागृहांमुळे नागरिकांना कमालीचा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गत वर्षी मनपाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने शहरात सात ते आठ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात आली. परंतु, सदर स्वच्छतागृहांची देखभाल ठेवल्या जात नसल्याने त्याठिकाणी घाण व दुर्गंधीचे साम्राज्य आहे. शासनाच्या ‘स्वच्छ महाराष्ट्र’ अभियानांतर्गत नागरिकांसाठी मोक्याच्या ठिकाणी अत्याधुनिक स्वच्छतागृह उभारण्याचे शासनाचे निर्देश आहेत. त्यानुषंगाने महापौर विजय अग्रवाल यांनी पुढाकार घेत मुख्य बाजारपेठसह शहराच्या इतरही भागात मोक्याच्या ठिकाणी स्वच्छतागृह उभारण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश नगररचना विभागाला दिले होते. या विभागाने पहिल्या टप्प्यात दहा जागा निश्चित केल्या आहेत. जिल्हाधिकाºयांच्या मंजुरीनंतर स्वच्छतागृह उभारण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याने महापौर विजय अग्रवाल यांनी स्वत: हा प्रस्ताव जिल्हाधिकाºयांकडे सादर केला.
स्वच्छतेचा मागमूस नाही!
मनपाच्यावतीने यापूर्वी ‘बीओटी’ तत्त्वावर पंचायत समितीलगत, सिंधी कॅम्पस्थित मनपा कार्यालय परिसर, जनता भाजी बाजार, सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासह अगदी बोटावर मोजता येणारे सार्वजनिक शौचालय उभारण्यात आले. या ठिकाणी नागरिकांजवळून शुल्क वसूल केले जात असले, तरी स्वच्छतेचा मागमूसही दिसत नसल्याने नागरिकांनी अशा घाणेरड्या स्वच्छतागृहांकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. साफसफाईचा अभाव असणाºया स्वच्छतागृहांची मान्यता रद्द करून दुसºया संस्थांना देण्याची गरज आहे.
आझाद कॉम्प्लेक्सच्या मागे नाल्यावर बांधकाम
शहरात सर्वाधिक वर्दळ गांधी रोडवर राहते. याठिकाणी एकही स्वच्छतागृह नसल्याने खरेदीसाठी येणाºया पुरुष व महिलांची चांगलीच कुचंबणा होते. गांधी रोडवरील आझाद कॉम्प्लेक्सच्या मागे चक्क मोठ्या नाल्यावर अनधिकृतरीत्या बांधकाम करून पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. ही जागा स्वच्छतागृहासाठी सोईस्कर असल्याने आयुक्त जितेंद्र वाघ यांनी परिसराची पाहणी करण्याची गरज आहे.
जिल्हाधिकाºयांकडे दहा जागांचा प्रस्ताव सादर केला असून, त्याला मंजुरी मिळताच आणखी दहा ठिकाणी ‘पे अॅन्ड यूज’ तत्त्वावर स्वच्छतागृह बांधल्या जातील.
-विजय अग्रवाल, महापौर