‘रोहयो’तून यंदा तयार होणार समृद्धी ‘लेबर बजेट’ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:22 AM2021-09-12T04:22:40+5:302021-09-12T04:22:40+5:30
महात्मा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्य शासनाने यावर्षीचे लेबर बजेट ‘समृद्धी लेबर बजेट’ म्हणून तयार करण्यासाठी यापूर्वीच राज्यातील ...
महात्मा राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत राज्य शासनाने यावर्षीचे लेबर बजेट ‘समृद्धी लेबर बजेट’ म्हणून तयार करण्यासाठी यापूर्वीच राज्यातील जिल्हा व तालुकास्तरावर प्रशिक्षण देण्यात आले आहे. राज्यात ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य व्यक्तीच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच गरिबी दूर करण्याकरिता रोहयो विभागाने ‘मी समृद्ध तर गाव समृद्ध आणि गाव समृद्ध तर महाराष्ट्र समृद्ध’ हे तत्त्व अंगीकारण्यात आले आहे. त्यामध्ये २०२२-२३ या आर्थिक वर्षात ‘रोहयो’तून समृद्धी लेबर बजेट व कामांचा वार्षिक कृती आराखडा तयार करण्याचे नियोजन निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात यावर्षी रोहयोतून समृद्धी बजेट व वार्षिक कामांचा कृती आराखडा जिल्हा परिषद व संबंधित यंत्रणांकडून तयार करण्यात येणार आहे.
समृद्धी लेबर बजेट, कृती आराखडा
तयार करण्याचे असे आहे नियोजन !
‘रोहयो’तून समृद्धी लेबर बजेट व वार्षिक कृती आराखडा तयार करण्यासाठी नियोजन निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार समृद्धी लेबर बजेट व कृती आराखडा तयार करण्यासाठी ७ ते १४ सप्टेंबर या कालावधीत गाव पातळीवर शिवार फेरी, १५ ते २० सप्टेंबर या कालावधीत गाव, वाडी व तांडा फेरी, २१ ते २४ सप्टेंबर दरम्यान ग्रामपंचायत स्तरावरील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक, २५ ते ३० सप्टेंबर कुटुंब समृद्धीसाठी सर्वेक्षण, २ ऑक्टोबर समृद्ध गावासाठी ग्रामसभा, १६ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत ग्रामपंचायत स्तरावरील लेबर बजेट अंतिम करणे, ५ डिसेंबरपर्यंत ग्रामपंचायत स्तरावरील आराखड्यांचे संकलन करून पंचायत समित्यांकडे सादर करणे, २० डिसेंबरपर्यंत पंचायत समितीद्वारे तालुक्यातील एकत्रित वार्षिक नियोजन कृती आराखड्यास मंजुरी देणे, २० जानेवारी २०२२ पर्यंत समृद्धी लेबर बजेट व वार्षिक कृती आराखडा जिल्हा परिषदेकडे सादर करून मंजुरी घेणे आणि ३१ जानेवारी २०२२ पर्यंत जिल्ह्याचे समृद्धी लेबर बजेट व वार्षिक कृती आराखडा मनरेगा आयुक्तालयाकडे पाठविणे.
ग्रामसभांमध्ये ‘सोशल ऑडिट’
मुद्द्यांचे होणार वाचन !
ग्रामसभांमध्ये समृद्धी बजेट व वार्षिक कृती आराखडा मांडताना, ग्रामपंचायतींच्या रोहयो कामांचे सामाजिक अंकेक्षण (सोशल ऑडिट) झाले असल्यास सामाजिक अंकेक्षणातील मुद्द्यांचे वाचन ग्रामसभांमध्ये करण्यात येणार आहे, असे सामाजिक अंकेक्षण संचालनालयाचे अकोला जिल्हा साधनव्यक्ती प्रवीण इंगळे यांनी सांगितले.