समृद्धी महामार्गाचाही होऊ शकतो विचार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 01:31 AM2017-07-19T01:31:50+5:302017-07-19T01:38:36+5:30
अकोला : नागपूर ते मुंबई या ७0६ किलोमीटर अंतराच्या ‘सुपर कम्युनिकेशन वे’ अर्थात समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाचे काम सध्या वेगात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : नागपूर ते मुंबई या ७0६ किलोमीटर अंतराच्या ‘सुपर कम्युनिकेशन वे’ अर्थात समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाचे काम सध्या वेगात आहे. हा मार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांचा ड्रिम प्रोजेक्ट आहे. याच मार्गाच्या बाजूने भविष्यात बुलेट ट्रेनचा मार्ग उभारण्याचा विचार मुख्यमंत्री फडणवीस यांच्या डोक्यात घोळत आहे.
समृद्धी महामार्गालगत पेट्रोल, डीझेल व नैसर्गिक वायूच्या वाहिन्या, तसेच हाय स्पीड इंटरनेट केबल प्रस्तावित आहे. त्याच सोबत आताच भविष्यातील बुलेट ट्रेनसाठी तरतूद करून ठेवण्याचा विचार एका कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवला होता.
एचएसआरसीद्वारा प्रस्तावित मार्गावरून बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय झाल्यास,समृद्धी महामार्गाला समांतर बुलेट ट्रेन सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे स्वप्न अर्धवट राहू शकते. समृद्धी महामार्गावर जालना ते नागपूर दरम्यान एकही मोठे शहर नसल्याने एचएसआरसीने मुंबई, नाशिक, औरंगाबाद, अकोला, अमरावती, नागपूर या मार्गास पसंती दिली असण्याची शक्यता आहे.
खामगाव-जालना मार्गाचे स्वप्न साकार होऊ शकते!
सन १९१० मध्ये इंग्रजांनी प्रस्तावित केलेला बुलडाण्यातील खामगाव- जालना हा रेल्वेमार्ग अजून कागदावरून ट्रॅकवर आलाच नाही. सन १९१२ मध्ये इंग्रजांनी या मार्गाला मान्यता दिल्यानंतर भूसंपादन झाले व १९२९ मध्ये चिखली तालुक्यातील उंद्री येथे जीआयपी रेल्वे इंजिनिअरिंग डिपार्टमेंट केसी रेल्वे कॅम्प या नावाने एक कार्यालय सुरू झाले. स्टेशनची गावे निश्चित झाली. शेतकऱ्यांच्या जमिनी पडीत टाकण्याचे आवाहन झाले. इतकेच नव्हे, तर पिकांचा मोबदला म्हणून शेतकऱ्यांना पैसेही देण्यात आले. रेल्वेमार्गासाठी मातीचा भराव टाकून काम प्रगतीपथावर आले. करोडो रुपयांचे साहित्य येऊन पडले व त्याच वेळी दुसरे महायुद्ध सुरू झाल्याने हे काम थंड बस्त्यात पडले ते आजतागायत. १९६३ च्या रेल्वे अर्थसंकल्पात या मार्गाच्या सर्वेक्षणाची घोषणा झाली. ३६८ कोटी ८१ लाखांचा हा मार्ग होईल, असा अंदाजही व्यक्त करण्यात आला; मात्र दरम्यानच्या काळात १९९४ च्या सर्वेक्षणात हा मार्ग फिजीबल नसल्याचा शेरा अधिकाऱ्यांनी मारला व या मार्गाला कायमचा लाल सिग्नल बसला आहे. दरम्यान, खामगाव-जालना या १५५.४ कि.मी. मार्गाऐवजी बऱ्हाणपूर-सोलापूर या ४५० कि.मी. मार्गाची मागणीही समोर आली. असे झाले तर खामगाव-चिखली-जालना असा ६० कि.मी.चा रेल्वेमार्ग तयार करण्याची गरज भासणार नव्हती; मात्र ही मागणीही थंड बस्त्यात पडल्याने आता बुलेट ट्रेनचा मार्ग याच जुन्या प्रस्तावित मार्गाने गेला तर शतकापासून प्रतीक्षा असलेला हा मार्ग प्रत्यक्षात येऊ शकतो.