अतिक्रमित सरकारी जमिनीवरील पिके निष्कासित करण्याला विरोध, जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून आंदोलन
By संतोष येलकर | Published: August 17, 2022 07:26 PM2022-08-17T19:26:04+5:302022-08-17T19:26:52+5:30
जिल्हायत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम सध्या जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे.
अकोला: अतिक्रमित सरकारी जमिनीवरील अर्धपरिपक्व पिके निष्कासित करण्याच्या कारवाईचा निषेध करीत बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भाई जगदीश इंगळे यांनी बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केले. जिल्ह्यात सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यात यावी, अतिक्रमकांविरुद्ध फिर्याद दाखल करावी;परंतु पिके निष्कासित होणार नाहीत याबाबत आदेश देण्यात यावे अशी मागणी ही त्यांनी केली.
जिल्हायत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम सध्या जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. यात वृक्ष लागवडीच्या नावाखाली अतिक्रमित शेतजमिनिवरील अर्धपरिपक्व पिके निष्कासित करण्याची कारवाईही सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या या कारवाईचा निषेध करीत बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भाई जगदीश इंगळे यांनी बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील इमारतीच्या छतावर चढून आंदोलन केले.
सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यासह अतिक्रमणधारकांविरोधात फिर्याद दाखल करण्यात यावी; मात्र अर्धपरिपक्व पिके निष्कासित करण्यात येऊ नयेत. याबाबत तातडीने आदेश देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांना दिले.
पोलिसांनी समजूत काढल्यानंतर उतरविले खाली!
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केले जात असल्याची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस कर्मचारी विजय झटाले यांनी आंदोलक भाई जगदीश इंगळे यांची समजूत काढून त्यांना इमारतीच्या छतावरून खाली उतरविले. त्यांनतर इंगळे यांनी मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.