‘वान’च्या पाण्यासाठी तेल्हाऱ्यात आक्रोश मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 12:31 PM2020-12-04T12:31:25+5:302020-12-04T12:43:31+5:30
Telhara News तेल्हाऱ्यात आक्रोश मोर्चा व शेगाव नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.
तेल्हारा: ‘वान’चे पाणी तेल्हारा तालुक्यातील नागरिकांना पिण्यासाठी व सिंचनासाठी आरक्षित करावे, खरीप हंगामाची आणेवारी ठरवून शेतकऱ्यांना दुष्काळ मदत निधी, पीकविम्याचा लाभ द्यावा, तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी दिवसा वीज पुरवठा करावा, रस्त्याची दुरुस्ती करावी, यांसह विविध मागण्यांसाठी शुक्रवार, ४ डिसेंबर रोजी युवाशक्ती संघटनेच्यावतीने तेल्हाऱ्यात आक्रोश मोर्चा व शेगाव नाका येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आला.
शुक्रवार, ४ डिसेंबरला सकाळ ६ पासून दुपारी १२ पर्यत बाजार पेठ बंद ठेवण्यात आली. दरम्यान सकाळी ११ वा पासुन टाॅवर चौक तेल्हारा शेगांव नाका तेल्हारा पर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी विविध मागण्यासाठी आक्रोश करून घोषणाबाजी करण्यात आली. नंतर शेगांव नाका तेल्हारा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या ठिकाणी जिल्हा प्रशासनाचे प्रतिनिधी उपजिल्हाधिकारी सुरंजुसे यांनी उपस्थित दर्शवून आंदोलकांच्या मागण्या ऐकून प्रशासनाचे वतीने सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल असे आश्वासन दिले. त्यानंतर संघटनेचे भवानी प्रताप यांनी आंदोलकांचे वतीने प्रशासनाला सात दिवसाची मुदत दिली. मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी तेल्हारा पोलीस स्टेशन ठाणेदार दिनेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.