पेरणी उलटलेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजारांची भरपाई द्या!
By Admin | Published: July 2, 2017 07:42 PM2017-07-02T19:42:36+5:302017-07-02T19:42:36+5:30
‘शेतकरी बचाओ आंदोलन’ची मागणी
अकोला : पावसाने दडी दिल्यामुळे गत महिन्यात पेरणी केलेल्या अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. अनेक शेतकऱ्यांनी उधार-उसनवारी किंवा कर्ज घेऊन केलेल्या पेरण्या उलटल्यामुळे या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई म्हणून हेक्टरी २५ हजार रुपयांची मदत शासनाने द्यावी, अशी मागणी शेतकरी बचाओ आंदोलनचे संयोजक भाई रजनीकांत यांनी जाहीर पत्रकाद्वारे केली आहे.
पेरणीसाठी तातडीची मदत म्हणून शासनाने शेतकऱ्यांना १० हजार रुपयांचे कर्ज देण्याची घोषणा केली होती; परंतु शेतकऱ्यांना हे कर्ज मिळाले नाही, तसेच नाफेडकडून तुरीचे चुकारेही मिळाले नाहीत. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी सावकाराकडून शेकडा पाच टक्के व्याज दराने सावकारांकडून पैशांची उचल करून पेरणी केली. पेरणी झाल्यानंतर मात्र पावसाने दडी मारल्याने अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांतील अनेक शेतकऱ्यांच्या पेरण्या उलटल्या आहेत. महसूल विभागाने सर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भाई रजनीकांत यांनी केली आहे. शेतकऱ्यांनी उलटलेल्या पिकाची माहिती, शेतशिवार, गावाचे नाव, पेरलेल्या बियाण्याचे नाव व क्षेत्रफळाची नोंद करून सर्वेक्षण तातडीने करण्यासाठी अर्ज आपल्या तालुक्याच्या तहसीलदारांकडे द्यावेत, असे आवाहनही शेतकरी बचाओ आंदोलनचे संयोजक भाई रजनीकांत यांनी केले आहे.