नुकसानग्रस्तांना तत्काळ भरपाई मिळवून द्या, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; सर्व यंत्रणांचा घेतला आढावा
By रवी दामोदर | Published: July 20, 2024 05:28 PM2024-07-20T17:28:47+5:302024-07-20T17:29:15+5:30
पावसाळा लक्षात घेता सर्व यंत्रणांनी सजग राहून जबाबदारी पार पाडणे आवश्यक असल्याचेही सांगितले
रवी दामोदर, अकोला: पावसाळा लक्षात घेता सर्व यंत्रणांनी सजग राहून जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी अतिवृष्टीने झाली असून, नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी (२० जुलै) रोजी दिले. जिल्हाधिकाऱ्यांनी विविध यंत्रणांचा ऑनलाइन बैठकीद्वारे आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी व विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कुंभार यांनी जिल्ह्यात काही ठिकाणी साथरोग उद्भवल्याच्या घटना घडल्या. त्यादृष्टीने पेयजल स्त्रोतांची सुरक्षितता, स्वच्छता, जलवाहिन्यांची सुरक्षितता तपासणे आवश्यक असल्याचे सांगितले.
कामात हलगर्जी आढळल्यास कठोर कारवाई!
आरोग्याच्या दृष्टीने गावोगाव जलस्त्रोतांची सुरक्षितता तपासावी. आवश्यकतेनुसार पर्यायी व्यवस्था उपलब्ध करावी. रुग्णालयातील यंत्रणा, औषध साठा आदी बाबी सुसज्ज ठेवाव्या. साथ रोगाविषयी प्रभावी जनजागृती करावी. धूर फवारणी, स्वच्छता मोहीम राबवावी. याबाबत ग्रामपंचायतींना सूचना द्याव्या, विविध ठिकाणी भेट देणार असून, कुठेही कामात हलगर्जी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशाराही जिल्हाधिकारी कुंभार यांनी बैठकीत दिला.
नदी-नाल्यांच्या ठिकाणी सूचना फलक लावा!
पावसाळ्यात सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने नदी- नाल्यांच्या ठिकाणी सूचना फलक लावण्यात यावेत. रस्त्याहून पाणी वाहत असेल तर सुरक्षित मार्गाने वाहतूक वळवावी. ग्रामीण भागातील रस्ते, वाहतूक सुस्थितीत व सुरळीत आहेत का याची तपासणी करावी. उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांनी दृष्टीने पाहणी करावी, असेही निर्देश कुंभार यांनी दिले.