‘लम्पी’मुळे जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांना बाजारभावाने मदत द्या; ‘वंचित’चा एल्गार
By संतोष येलकर | Published: September 13, 2022 03:56 PM2022-09-13T15:56:57+5:302022-09-13T15:57:03+5:30
जिल्हाधिकारी, पशुसंवर्धन उपायुक्तांना दिले निवेदन
अकोला: जिल्हयात जनावरांमधील ‘लम्पी’ या त्वचारोग आजाराने थैमान घातले असून, या आजाराने बाधीत जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांना शासनाने जनावरांच्या बाजारभावाने नुकसान भरपाइची मदत द्यावी , या मागणीसाठी एल्गार पुकारित वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा शाखेच्यावतीने मंगळवारी जिल्हाधिकारी व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांना निवेदन देण्यात आले.
जिल्हयात जनावरांमधील ‘लम्पी’ या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला असून, जिल्हयातील विविध भागात जनावरांना या रोगाची लागन झाली आहे. तसेच या आजाराची लागन झालेल्या काही जनावरांचा मृत्यू झाला आहे. आधीच अतिवृष्टीच्या तडाख्यात पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला असताना, जनावरांमधील ‘लम्पी’आजाराच्या वाढत्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांच्या संकटात आणखी भर पडली आहे. या पार्श्वभूमीवर ‘लम्पी’ आजारामुळे जनावरे दगावलेल्या शेतकऱ्यांना तातडीने जनावरांच्या बाजारभावाने नुकसान भरपाइची मदत शासनाकडून तातडीने देण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्हा शाखेच्यावतीने जिल्हाधिकारी व जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांकडे निवदेनाव्दारे करण्यात आली.
यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महासचिव मिलींद इंगळे, महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, शोभा शेळके, जिल्हा परिषद सदस्य नीता गवइ, संगीता अढाऊ, तेजस्विनी बागडे, विकास सदांशिव, मंदा वानखडे, किशोर जामनिक, देवराव राणे, शरद इंगाले, शंकरराव राजुसकर, दिनकरराव खंडारे, मोहन तायडे, संजय वाडकर,धर्मेंद्र दंदी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लसीकरणाची मोहिम राबवा; आैषधोपचरासाठी आर्थिक मदत करा !
जिल्हयात जनारांच्या ‘लम्पी ’ प्रतिबंधक लसीकरणाची , मोठ्या प्रमाणात राबविण्यात यावी आणि जेथे लसीकरणासाठी मनुष्यबळाची कमतरता आहे, तेथे जनावरांच्या आैषधोपचारासाठी तात्काळ आर्थिक मदत करण्यात यावी, अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीच्यावतीने निवेदनात करण्यात आली आहे.