अकोल्यातील पडीत प्रभागाच्या साफसफाईसाठी साडेपाच कोटींची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 02:46 PM2018-04-28T14:46:35+5:302018-04-28T14:46:35+5:30
प्रथमच पडीत प्रभागातील साफसफाईसाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असून, या कामासाठी साडेपाच कोटींची तरतूद करण्याला मनपाच्या स्थायी समितीने मंजुरी दिली.
अकोला : खासगी सफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पडीत प्रभागातील साफसफाई केली जाते. आजवर संबंधित कंत्राटदारांना दर तीन महिन्यांची मुदतवाढ देऊन निविदा प्रक्रियेला फाटा दिला जात होता. यावेळी प्रथमच पडीत प्रभागातील साफसफाईसाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली असून, या कामासाठी साडेपाच कोटींची तरतूद करण्याला मनपाच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. स्थायी समिती सभापती विशाल इंगळे यांनी निविदा प्रक्रियेवर शिक्कामोर्तब केले.
महापालिकेच्या स्थायी समिती सभागृहात शुक्रवारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेत पडीत प्रभागातील (वार्ड) साफसफाईसाठी रकमेत वाढ करण्याचा विषय पटलावर आला असता, भाजप नगरसेवक सुनील क्षीरसागर यांनी भूमिका स्पष्ट केली. यापूर्वी पडीत प्रभागांमध्ये खासगी तत्त्वावर साफसफाईची कामे करणाºया कंत्राटदारांना प्रतिमहिना ५० हजार रुपये अदा केले जात होते. त्याबदल्यात प्रभागात १५ कर्मचारी असणे क्रमप्राप्त होते. परंतु, एवढ्या अल्प मोबदल्यात काम करण्यास सफाई कर्मचारी टाळाटाळ करीत असल्याने कंत्राटदारांची व पर्यायाने नगरसेवकांची कुचंबणा होत असल्याचा मुद्दा सुनील क्षीरसागर यांनी मांडला. त्यावर बाळ टाले, विनोद मापारी यांनी मनपाच्या आस्थापनेवरील सफाई कर्मचाºयांच्या वेतनावर होणाºया खर्चाची माहिती सभागृहात सादर केली. पडीत प्रभागांतील साफसफाईच्या तुलनेत आस्थापनेवरील सफाई कर्मचाºयांच्या वेतनावर जास्त खर्च होत असल्याचे सभागृहासमोर आले. त्यामुळे खासगी सफाई कर्मचाºयांसाठी संबंधित कंत्राटदारांना प्रति महिना ११ लाख रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. २० प्रभागांपैकी नवीन प्रभाग पूर्णत: पडीत असून, शहरातील काही जुन्या प्रभागांचा समावेश होतो. त्यासाठी ५१ कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली असून, या कामासाठी ५ कोटी ६१ लाख रुपयांची तरतूद करण्याला स्थायी समिती सभापती विशाल इंगळे यांनी मंजुरी दिली.