महापालिकेच्या बिंदू नामावलीत मराठा आरक्षणाची होणार तरतूद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 12:36 PM2019-11-15T12:36:25+5:302019-11-15T12:36:36+5:30

जानेवारी २०१९ पासून बिंदू नामावलीत मराठा आरक्षणानुसार बिंदूचा समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत.

Provision for reservation of Maratha reservation in Roster of Akola Municipal Corporation | महापालिकेच्या बिंदू नामावलीत मराठा आरक्षणाची होणार तरतूद

महापालिकेच्या बिंदू नामावलीत मराठा आरक्षणाची होणार तरतूद

googlenewsNext

- आशिष गावंडे 
लोकमत न्यूज नेटवर्क
महापालिकेतील रिक्त पदांचा अनुशेष दूर करण्यासाठी प्रशासनाद्वारे सरळसेवा पदभरती राबवल्या जाणार आहे. त्याकरिता बिंदू नामावली अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेला मनपा प्रशासनाने प्रारंभ केला असून, जानेवारी २०१९ पासून त्यामध्ये मराठा आरक्षणाच्या तरतुदीचा समावेश करण्यात येईल. बिंदू नामावलीत १३ टक्के मराठा आरक्षण आणि १० टक्के आर्थिक दुर्बल घटकातील (खुला प्रवर्ग) आरक्षणाचा समावेश केल्यानंतरच बिंदू नामावली निश्चित करून तसा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे.
महापालिकेची प्रशासकीय गाडी रूळावर आणण्यासाठी महापौर विजय अग्रवाल यांनी तांत्रिक व लेखा संवर्गातील ७३५ रिक्त पदांसाठी सरळसेवा पदभरती राबवण्याचे निर्देश ७ नोव्हेंबर रोजीच्या आढावा बैठकीत मनपा आयुक्त संजय कापडणीस यांना दिले होते. मनपा प्रशासनाने २००४ पासून बिंदू नामावली अद्ययावत केली नसल्याने अनुसूचीत जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष सी.एस.थूल यांनी बिंदू नामावली अद्ययावत करण्याचे निर्देश आॅगस्ट २०१५ मध्ये महापालिकेला दिले होते. त्यानुषंगाने सप्टेंबर २०१५ मध्ये तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांनी बिंदू नामावलीचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले होते. या विभागाने चार महिन्यांत प्रस्ताव तयार करून २०१६ मध्ये सदर प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर केला होता. पदोन्नती प्रक्रियेच्या बिंदू नामावलीला मंजुरी मिळाली नसली तरी सरळ सेवा पदभरतीच्या नामावलीला विभागीय आयुक्त कार्यालयाने मंजुरी दिली होती. यादरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात शासन निर्णय ध्यानात घेऊन मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी सामान्य प्रशासन विभागाला जानेवारी २०१९ पासून बिंदू नामावलीत मराठा आरक्षणानुसार बिंदूचा समावेश करण्याचे निर्देश दिले आहेत.

१३ टक्के मराठा आरक्षणाची तरतूद
मराठा आरक्षणाच्या संदर्भात मनपाला अधिसूचना व निर्देश प्राप्त झाले आहेत. यामध्ये १३ टक्के मराठा आरक्षण आणि १० टक्के आर्थिक दुर्बल घटकातील (खुला प्रवर्ग)आरक्षणाचा समावेश आहे. सुधारित बिंदू नामावली निश्चित झाल्यानंतर पुढे भविष्यात खुल्या प्रवर्गातील कर्मचाऱ्यांचे आरक्षण व सेवाज्येष्ठतेचे निकष लक्षात घेऊन त्या-त्या पदांवर पदोन्नती द्यावी लागेल. सरळसेवा पदभरतीद्वारे खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांचा मार्ग मोकळा होणार असल्याने या पदभरतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.


दर तीन वर्षांनंतर पुनर्तपासणी
२५ जानेवारी २०१६ मध्ये मनपाने विभागीय आयुक्तांकडे सादर केलेल्या बिंदू नामावलीमध्ये सरळसेवा पदभरतीला मंजुरी दिली होती. १ जानेवारी ते ३१ डिसेंबर हा बिंदू नामावलीचा कालावधी निश्चित आहे. यामध्ये वर्षभराचा गोषवारा तयार केला जातो. मनपा प्रशासनाने दर तीन वर्षांनंतर बिंदू नामावली अद्ययावत करून पुनर्तपासणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करणे क्रमप्राप्त आहे.



मराठा आरक्षण १३ की १६ टक्के या मुद्यावर प्रशासकीय स्तरावर संभ्रम होता. हा संभ्रम दूर झाला असून, १३ टक्के आरक्षणानुसार मनपाची सुधारित बिंदू नामावली तयार केली जाईल. तसे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले असून, हा विभाग कामाला लागला आहे. पुढील आठ-दहा दिवसांत बिंदू नामावलीचा प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाकडे सादर करण्यात येईल.
-संजय कापडणीस, आयुक्त, मनपा.

 

Web Title: Provision for reservation of Maratha reservation in Roster of Akola Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.