भूमिगत वीज वाहिनीसाठी ११ लाखांची तरतूद
By admin | Published: July 5, 2017 01:24 AM2017-07-05T01:24:36+5:302017-07-05T01:24:36+5:30
गोवर्धन शर्मा यांचा पुढाकार: टिळक रोडचा तिढा निकाली
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: शहराच्या मध्यभागी असलेल्या टिळक रोडच्या रुंदीकरणाला अडथळा ठरणाऱ्या वीज वाहिन्या, विद्युत खांब हटवून त्या ठिकाणी नवीन भूमिगत वीज वाहिनीचे जाळे टाकण्यासाठी आमदार गोवर्धन शर्मा यांनी ११ लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळे टिळक रोडच्या रुंदीकरणाला गती येणार असल्याचे दिसत आहे.
मागील वर्षभरापासून शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीला वेग आला आहे. भाजपाच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्ते दुरुस्तीला प्राधान्य दिले असून, त्याकरिता शासनाकडून कोट्यवधींचा निधी प्राप्त होत असल्याचे दिसून येते. प्रमुख रस्त्यांची दुरवस्था लक्षात घेता सिमेंट रस्त्यांचे निर्माण कार्य केले जात आहे. यामध्ये प्रामुख्याने सिव्हिल लाइन रोड, दुर्गा चौक ते वसंत देसाई स्टेडियम, रतनलाल प्लॉट ते टॉवर चौक, माळीपुरा ते मोहता मिल रोड, श्रीवास्तव चौक ते डाबकी रोड, अशोक वाटिका ते तुकाराम चौक, नेहरू पार्क ते थेट दुर्गा चौक, मानव शोरूम ते सोमठाणा आदी प्रमुख रस्त्यांना प्राधान्य देण्यात आले. रस्ते दुरुस्तीनंतर त्यावर एलईडी पथदिवे लावले जात आहेत.
याकरिता आवश्यक निधी खेचून आणण्यासाठी आमदार गोवर्धन शर्मा, आ. रणधीर सावरकर, महापौर विजय अग्रवाल शासनाकडे सतत पाठपुरावा करीत असल्याचे चित्र आहे. शहरातील सर्वाधिक वर्दळीचा म्हणून ओळख असणाऱ्या टिळक रोडच्या रुंदीकरणासाठी आ. गोवर्धन शर्मा यांनी आजवर १३ कोटींचा निधी खेचून आणला. सिटी कोतवाली ते शिवाजी महाविद्यालयापर्यंत प्रशस्त असा सिमेंट रोड तयार केला जात आहे. यादरम्यान, रस्त्याच्या मधात असणाऱ्या भूमिगत वीज वाहिन्या, विद्युत खांब हटविण्याचे रखडले होते. महावितरण कंपनीच्या स्तरावर कामकाज होत नसल्याचे पाहून आ. गोवर्धन शर्मा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला सदर काम करण्याचे निर्देश दिले. यासाठी ११ लाख रुपये निधी उपलब्ध करून दिल्यामुळे रस्ता रुंदीकरणाचा अडथळा दूर झाला आहे.
कार्यक्रमाला ठाणेदार शैलेश सपकाळ, फारूख भुरानी, हाजी इकबाल विंधाणी, हाजी जकरिया, आरीफ आमदानी, मजीद भुराणी, सोहेब लाखानी, जुनेद लाखानी, डॉ. असलम, डॉ. सत्तार, फिरोज अमादानी, हनीफ भाई, गुरफानभाई, हाजी अनीक, साबीर भाई, इब्राहीम चौहान, हाजी मुदाम, सिराज कुरेशी, फजल कुरेशी, शकूर लोधी, युनूस बकाली, लोकसेवासंघचे डॉ. योगेश साहू, सलिम मीर्झा आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
टिळक रोडला खोदून सिमेंट रस्ता तयार केला जात आहे. त्या ठिकाणी असलेल्या वीज वाहिन्या, विद्युत खांब हटविताच शालिनी टॉकीज ते ब्रिजलाल बियाणी चौकपर्यंतचा रस्ता लवकरच पूर्ण केला जाईल.
- आमदार गोवर्धन शर्मा