व्यावसायिकांना दिली प्रलाेभने; आता राजकीय पदाधिकाऱ्यांवर लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:18 AM2021-04-25T04:18:40+5:302021-04-25T04:18:40+5:30
शहरातील जनता भाजी बाजारात प्रस्तावित वाणिज्य संकुल उभारण्याच्या मुद्यावर राजकीय घडामाेडींनी वेग घेतला आहे. आज राेजी या जागेत व्यवसाय ...
शहरातील जनता भाजी बाजारात प्रस्तावित वाणिज्य संकुल उभारण्याच्या मुद्यावर राजकीय घडामाेडींनी वेग घेतला आहे. आज राेजी या जागेत व्यवसाय करणाऱ्या काही व्यावसायिकांना एका गाेपनीय बैठकीत दुकाने मिळवून देण्यासाठी प्रलाेभन दाखविण्यात आले आहे, तर दुसरीकडे शासनाकडे व्यावसायिकांची बाजू लावून धरणाऱ्या काँग्रेसमधील एका राजकीय नेत्याचे मन वळविण्यासाठी शिवसेनेतील एका स्थानिक लाेकप्रतिनिधीमार्फत जाेरदार प्रयत्न केले जात असल्याची माहिती आहे.
दुकाने तुम्हालाच दिली जातील !
मनपा प्रशासनाने बाजारातील व्यावसायिकांना दुकाने खाली करण्याची नाेटीस दिली असून, याविराेधात सर्व व्यावसायिकांनी न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. भविष्यात कायदेशीर पेच निर्माण झाल्यास काेणतीही कंपनी वाणिज्य संकुलाचे काम स्वीकारणार नाही, याची खात्री असलेल्या शिवसेनेतील एका लाेकप्रतिनिधीने काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्याच्या मदतीने नुकतीच बाजारातील निवडक व्यावसायिकांची गाेपनीय बैठक घेतली. या बैठकीत प्राधान्याने दुकाने तुम्हालाच दिली जातील, असे सांगण्यात आल्याची माहिती आहे़
काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचे मन वळविण्याचे प्रयत्न
भाजी बाजारातील काही व्यावसायिकांना प्रलाेभने दिल्यानंतर हा मुद्दा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटाेले यांच्याकडे मांडणाऱ्या काँग्रेस पक्षातील एका आक्रमक पदाधिकाऱ्याचे मन वळविण्यासाठी जाेरदार प्रयत्न केले जात आहेत. यातही काँग्रेसमधील एका ज्येष्ठ नेत्यानेच मध्यस्थी केल्याची माहिती आहे.