पं. स. सभापतीपदांसाठी रस्सीखेच सुरू!
By admin | Published: June 25, 2016 02:13 AM2016-06-25T02:13:01+5:302016-06-25T02:13:01+5:30
अकोला जिल्हय़ातील सातही पंचायत समितींच्या सभापती-उपसभापतींची निवड २८ जून रोजी.
संतोष येलकर / अकोला
जिल्हय़ातील सातही पंचायत समितींच्या सभापती-उपसभापतींची निवड २८ जून रोजी करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जिल्हय़ात सुरू झालेल्या विविध राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीत सभापतिपदांसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
जिल्हय़ातील अकोला, आकोट, बाळापूर, बाश्रीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही पंचायत समितींच्या विद्यमान सभापती व उपसभापतींचा अडीच वर्षांचा कालावधी येत्या २७ जून रोजी संपत आहे. या पृष्ठभूमीवर पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी पंचायत समितींच्या नवीन सभापती व उपसभापतींची निवड २८ जून रोजी बोलविण्यात आलेल्या पंचायत समितींच्या विशेष सभेत करण्यात येणार आहे.
त्यानुषंगाने जिल्हय़ातील सातही पंचायत समितींच्या सभापतिपदांचे प्रवर्गनिहाय आरक्षण २३ जून रोजी जाहीर करण्यात आले. आरक्षण निश्चित झाल्यानंतर आणि सभापती-उपसभापतींच्या निवडीसाठी चार दिवसांचा कालावधी उरला असताना, पंचायत समित्यांमध्ये सत्ता स्थापनेसाठी विविध राजकीय पक्षांच्या मोर्चेबांधणीला वेग आला आहे. सभापतिपद मिळविण्यासाठी आवश्यक असलेले सदस्यांच्या संख्याबळाची जुळवाजुळव करण्यासह विविध राजकीय राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यामध्ये सदस्य संख्याबळाच्या आधारे संबंधित राजकीय पक्षांकडून सभापतिपद मिळविण्यासाठी आवश्यक असलेल्या समीकरणांची चाचपणी करण्यात राजकीय पुढार्यांनी कंबर कसली आहे. त्यासाठी पक्षनिहाय पंचायत समिती सदस्यांच्या गोपनीय बैठका आणि सत्ता स्थापनेच्या हालचालींना गती आली आली. त्यामुळे जिल्हय़ातील सातही तालुक्यात सुरू झालेल्या राजकीय घडामोडींमध्ये सभापतिपदांसाठी दावेदारांकडून रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र आहे.