शिबिरांमधून केली ‘ब्रेस्ट कॅन्सर’बाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:26 AM2017-09-25T01:26:54+5:302017-09-25T01:27:01+5:30
अकोला : दर दहा महिलांमागे एका महिलेला स्तनाच्या गाठीच्या आजाराने ग्रासले असून, ही अतिशय चिंताजनक बाब आहे. महिला भीतीपोटी हा आजार लपवितात म्हणून महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी आतापर्यंत अकोला जिल्ह्यात सुमारे ३५ शिबिरे घेण्यात आली असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील सहयोगी प्राध्यापिका कल्पना काळे (अस्वार) यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क

वैद्यकीय शिक्षण विभाग, मुंबई यांच्याकडून आलेल्या सूचनेनुसार, अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्यावतीने जिल्हाभर स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती अभियान राबविण्यात आले. महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंत सुमारे ३५ शिबिरांमधून महिलांची तपासणी करून महिलांना या आजाराबाबतची माहिती देण्यात आली. १६ सप्टेंबर रोजी आपातापा प्राथमिक आरोग्य केंद्रात, १७ सप्टेंबर रोजी केशव नगरस्थित बदरखे क्लिनिक येथे, तर २0 सप्टेंबर रोजी महान येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करणारी शिबिरे आयोजित करण्यात आली. या शिबिरांमध्ये डॉ. कल्पना काळे (अस्वार) यांनी महिलांना स्तन कर्करोगाची माहिती देतानाच या आजाराची लक्षणे आणि कारणे याबाबतही सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी महिलांना स्वत: तपासणी कशी करावी, याचीही माहिती दिली. सुमारे १५0 च्यावर महिलांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरांमध्ये परिचारिका स्वाती यादव यांनी आयब्रीस्ट मशीनद्वारे महिलांची तपासणी केली असता पाच महिलांना हा आजार झाल्याचे आढळून आले. त्यांना पुढील उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय येथे संदर्भीत करण्यात आल्याची माहितीही डॉ. काळे यांनी दिली.
दहा महिलांमागे एकीला ‘ब्रेस्ट कॅन्सर’
दर दहा महिलांच्या मागे एका महिलेला हा स्तनाचा कर्करोग झाल्याचे दिसून येत आहे, ही चिंतेची बाब असून, महिलांनी हा आजार लपवून न ठेवता त्याची लक्षणे आढळल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा कोणत्याही सरकारी दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी आणि भविष्यात होणारा संभाव्य धोका टाळावा, असे आवाहन डॉ. कल्पना काळे यांनी केले आहे.