सार्वजनिक आरोग्य विभागाचे संकेतस्थळावर महिला आरोग्य अभियानाची पाटी कोरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 03:17 PM2018-12-22T15:17:33+5:302018-12-22T15:18:04+5:30
अकोला : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संकेतस्थळ गत वर्षभरापासून अद्ययावत नाही, तर संकेतस्थळावर महिला आरोग्य अभियानाची पाटी कोरीच आहे.
अकोला : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे संकेतस्थळ गत वर्षभरापासून अद्ययावत नाही, तर संकेतस्थळावर महिला आरोग्य अभियानाची पाटी कोरीच आहे. शिवाय, राष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन, पीएचडी पदव्युत्तर योजनांसह इतरही योजनांची अद्ययावत माहिती उपलब्ध नाही.
कुठल्याही योजनांची माहिती हवी असेल, तर आज प्रत्येक व्यक्ती वेळ खर्च न करता घरीच संबंधित विभागाच्या संकेतस्थळाला भेट देऊन हवी ती माहिती मिळवितो. त्यात विषय आरोग्याच्या बाबतीत असेल, तर शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनांची माहिती घेण्यास प्राधान्य देतो; मात्र योग्य वेळी आवश्यक माहिती न मिळाल्यास ऐन वेळेवर समस्या उद्भवतात. अनेकदा त्याचा आर्थिक अन् मानसिक फटकाही बसतो. हीच बाब सध्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या संकेतस्थळाच्या बाबतीत घडत आहे. गत वर्षभरापासून संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आलेले नाही. यामध्ये प्रामुख्याने महिला आरोग्य अभियानाची माहितीच उपलब्ध नाही. शिवाय, राष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, पीएचडी पदव्युत्तर योजनेची माहितीदेखील उपलब्ध नाही.
डॉक्टरांची माहितीही अद्ययावत नाही!
आरोग्य विभागाच्या संकेतस्थळावर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय तसेच मोबाइल युनिट, अंध विद्यालय, टीबी रुग्णालयात उपलब्ध वर्ग-१ आणि वर्ग-२ च्या डॉक्टरांची माहितीदेखील अद्ययावत नाही. बहुतांश जिल्ह्यांमध्ये वर्ग-१ डॉक्टरांची माहितीच उपलब्ध नसल्याचे दाखविते, तर संकेतस्थळात शेवटचा केलेला बदलही वर्षभरापूर्वीचा दाखविण्यात येत आहे.
तक्रार क्रमांकही लागेना
संकेतस्थळावर देण्यात आलेला तक्रार क्रमांकावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यास चुकीचा क्रमांक असल्याचे सांगण्यात येते.
सार्वजनिक आरोग्य विभागाला दररोज माहिती पाठविण्यात येते. संकेतस्थळावर माहिती अद्ययावत करणे अपेक्षित आहे. यासंदर्भात वरिष्ठांना कल्पना देऊ.
- डॉ. रियाज फारुकी, आरोग्य उपसंचालक