जिल्ह्यात १९ रुग्णालयांमध्ये ‘जनआरोग्य’ सुविधा; आठ हजार कोविड रुग्णांना मिळाला योजनेचा आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:19 AM2021-05-20T04:19:40+5:302021-05-20T04:19:40+5:30
महत्त्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत विविध आजारांवर अनेकांनी उपचार घेतले आहेत, मात्र कोरोनावर योजनेंतर्गत उपचार होतात याची माहिती अनेकांना नाही. ...
महत्त्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत विविध आजारांवर अनेकांनी उपचार घेतले आहेत, मात्र कोरोनावर योजनेंतर्गत उपचार होतात याची माहिती अनेकांना नाही. त्यामुळे खासगीत उपचारासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठी रक्कम मोजावी लागते. कोविडच्या उपचारासाठी खासगी रुग्णालयात ८० हजारांपासून ते दोन अडीच लाख रुपयांपर्यंतचे पॅकेजेस आहेत. उपचारासाठी लागणारा पैसा जमविण्यासाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मोठी कसरत करावी लागते. जिल्ह्यात सद्यस्थितीत १९ रुग्णालयांमध्ये महत्त्मा फुले जन आरोग्य याजनेंतर्गत कोविड रुग्णांवर उपचार सुरू केले जात आहेत. आतापर्यंत या रुग्णालयांमध्ये जिल्ह्यातील ८ हजार ३२३ रुग्णांवर उपचार केल्याची माहिती आहे. एकूण रुग्णांच्या तुलनेत ही आकडेवारी केवळ १६ टक्केच आहे. रुग्णाच्या गरजेनुसार विविध पॅकेजेसमध्ये योजनेंतर्गत रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
शेती विका, व्याजाने पैसे काढा पण पैसे भरा
कोरोना झाला की रुग्ण व त्यांचे नातेवाईक भीतीपोटी वाटेल ते करायला तयार असतात. याचाच फायदा अनेकांकडून रुग्ण व त्यांच्या नोतवाईकांची लुट सुरू असते. उपचारासाठी लागणारा पैसा कुठुनही आणा, पण पैसे भरावेच लागतील असे खासगी रुग्णालयांकडून सांगण्यात येते. त्यासाठी रुग्णाचे नातेवाईक स्वत:ची शेती विकतात. काही लोक व्याजाने पैसा घेतात. अशा वेळी रुग्णांना जनआरोग्य योजनेतून उपचाराची गरज असते, मात्र रुग्णांवर जनआरोग्य योजनेतून उपचार होताना दिसून येत नाही. उलट रुग्णांकडून निघेल तेवढा पैसा काढण्यात येत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
गरजेनुसार पॅकेजेस
कोविडच्या प्रत्येक रुग्णांमध्ये वेगवेगळी लक्षणे असतात. त्यामुळे त्यांच्यावर उपचारही वेगवेगळा करावा लागतो. त्यामुळे जनआरोग्य योजनेंतर्गत रुग्णांना गरजेनुसार पॅकेजेस उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. मात्र, पॅकेजेस कमी असल्याने रुग्णालयांकडून योजनेंतर्गत उपचार देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचेही काही ठिकाणी आढळून आले आहे. त्यामुळे योजनेस पात्र असूनही रुग्णांना आर्थिक फटका सोसावा लागतो.
अशी करा नोंदणी
महत्मा फुले जनआरोग्य योजनेशी संलग्न असलेल्या रुग्णालयात आरोग्य मित्रांमार्फत नोंदणी करता येते.
योजनेंतर्गत उपचारासाठी आवश्यक कागदपत्रे जवळ नसतील, तरी उपचार सुरू करून नंतर कागदपत्रे देता येतात.
तर करा तक्रार
रुग्णालयांनी योजनेंतर्गत उपचार नाकारल्यास जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा शल्य चिकित्सक किंवा महात्माफुले जनआरोग्य योजनेच्या जिल्हा समन्वयकाकडे तक्रार करता येते.
योजनेशी जोडलेली जिल्ह्यातील रुग्णालये - १९
एकूण कोरोना बाधित - ५१६४९
एकूण कोरोनामुक्त - ४४१४५
आतापर्यंत झालेले मृत्यू - ९५८
सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण - ६५४६
योजनेचा लाभ घेतलेले रुग्ण - ८, ३२३