माना येथील सार्वजनिक शौचालयाचे काम निकृष्ट दर्जाचे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:14 AM2021-06-28T04:14:22+5:302021-06-28T04:14:22+5:30
मूर्तिजापूर: तालुक्यातील माना येथे जिल्हा परिषदेंतर्गत सार्वजनिक शौचालये पूर्ण करण्यात आले असून, शौचालयाचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार ...
मूर्तिजापूर: तालुक्यातील माना येथे जिल्हा परिषदेंतर्गत सार्वजनिक शौचालये पूर्ण करण्यात आले असून, शौचालयाचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संतोष गोपीचंद कोकणे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती मूर्तिजापूर यांच्याकडे केली आहे.
माना येथे बांधण्यात आलेले सार्वजनिक शौचालये अतिशय निकृष्ट दर्जाचे असून, सदरचे बांधकाम इस्टिमेटनुसार झाले नसल्याचा आरोप तक्रारदार संतोष कोकणे यांनी केला आहे. दिलेल्या नियमानुसार, शौचालयाला जोडून मुतारी असणे आवश्यक आहे, परंतु मुतारी बांधण्यात आली नाही. टीन शेड व बेसिनही बसविले नाही. शौचालयाचा खड्डा तिथून ५० मीटर अंतरावर असायला पाहिजे, परंतु तो जागेवरच करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. शौचालयाला बसविण्यात आलेले दरवाजे अत्यंत हलक्या प्रतिचे आहेत, शौचालयावर पाण्याची टाकी बसविली असली, तरी पाण्याची व्यवस्था नाही. एकंदरीत सदर शौचालयाचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे असून, संबंधितावर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. मागणी पूर्ण न झाल्यास उपोषणाचा इशाराही तक्रारीत दिला आहे. (फोटो)