अवघ्या चार दिवसांत सार्वजनिक शौचालय कोसळले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 02:28 AM2017-08-12T02:28:35+5:302017-08-12T02:28:47+5:30
अकोला : सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करून चार दिवसांचा अवधी होत नाही, तोच शौचालयाची संपूर्ण भिंत कोसळल्याचा प्रकार प्रभाग ८ अंतर्गत येणार्या डाबकी येथे उघडकीस आला. निर्माणाधिन शौचालयाचे बांधकाम सुमार दर्जाचे होत असल्याचा आरोप डाबकी येथील रहिवाशांनी केला असून, याप्रकरणी महापालिका प्रशासन कंत्राटदारावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करून चार दिवसांचा अवधी होत नाही, तोच शौचालयाची संपूर्ण भिंत कोसळल्याचा प्रकार प्रभाग ८ अंतर्गत येणार्या डाबकी येथे उघडकीस आला. निर्माणाधिन शौचालयाचे बांधकाम सुमार दर्जाचे होत असल्याचा आरोप डाबकी येथील रहिवाशांनी केला असून, याप्रकरणी महापालिका प्रशासन कंत्राटदारावर काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्र शासनाच्या ‘स्वच्छ भारत’अभियानांतर्गत शहर हगणदरीमुक्त करण्यासाठी महापालिका प्रशासनाच्यावतीने गरजू लाभार्थींना वैयक्तिक शौचालय बांधून दिले जात आहे. शहराची हद्दवाढ झाल्यानंतर नवीन प्रभागांमध्ये नागरिकांकडे शौचालयेच नसल्याचे चित्र समोर आले.
पहिल्या टप्प्यात शहरात वैयक्तिक तसेच आवश्यक त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालये बांधून दिल्यानंतर दुसर्या टप्प्यात नवीन प्रभागांमध्ये शौचालये बांधणीला सुरुवात करण्यात आली. मनपा क्षेत्रात सामील झालेल्या प्रभाग ८ मधील डाबकी येथे सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम सुरू करण्यात आले.
याठिकाणी दहा ‘सिट’ची व्यवस्था करण्यात आली. शौचालयांचे बांधकाम करून चार दिवसांचा अवधी होत नाही, तोच शौचालयाची संपूर्ण भिंत कोसळल्याचा प्रकार उजेडात आला. त्यामुळे शौचालयाचे बांधकाम सुमार दर्जाचे झाल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या निधीची अशाप्रकारे उधळपट्टी होत असल्यामुळे या प्रकरणी प्रशासन काय निर्णय घेते, याकडे अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.
स्वच्छता विभाग, बांधकाम विभाग संशयाच्या घेर्यात
शहरात सार्वजनिक असो वा वैयक्तिक शौचालय बांधण्याची जबाबदारी मनपाच्या स्वच्छता विभागाकडे आहे. असे असताना शौचालय बांधकामाची फाइल बांधकाम विभागामार्फत चालवण्यात आल्याची माहिती आहे, तर शौचालयाच्या बांधकामांवर केवळ देखरेख ठेवण्याची जबाबदारी असल्याचे सांगत बांधकाम विभागाने हात झटकत चेंडू स्वच्छता विभागाकडे टोलवला. एकूणच गंभीर प्रकार लक्षात घेता, दोन्ही विभाग संशयाच्या घेर्यात सापडले आहेत.
कनिष्ठ अभियंता होते कोठे?
सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामावर देखरेख ठेवण्याची जबाबदारी बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंत्यावर होती. शौचालयाचे निकृष्ट बांधकाम होत असताना संबंधित अभियंता नेमके कोणते कर्तव्य बजावत होते, असा सवाल उपस्थित होतो.
अन् नगरसेवकांची धावाधाव सुरू!
प्रभाग ८ मध्ये चारही नगरसेवक भाजपाचे आहेत. एका नगरसेवकाच्या मर्जीतल्या कंत्राटदाराला शौचालय बांधण्याचा कंत्राट मिळवून देण्यात आला. शौचालय कोसळल्यानंतर कंत्राटदाराला वाचविण्यासाठी नगरसेवकाने धावाधाव सुरू केली आहे. शौचालयाचे बांधकाम योग्यरीतीने होत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे स्वत:हून शौचालयाची भिंत पाडल्याची सारवासारव नगरसेवकाने सुरू केल्याची माहिती आहे. शासन निधीची अशारीतीने उधळपट्टी होत असल्यामुळे या प्रकरणी महापालिका आयुक्त अजय लहाने काय भूमिका घेतात, याकडे सर्वांंचे लक्ष लागले आहे.