देवरी फाटा परिसरात रस्त्यावर पाण्याचे डबके!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:18 AM2021-09-25T04:18:37+5:302021-09-25T04:18:37+5:30
वरुर जऊळका: अकोट-अकोला मार्गावर असलेल्या देवरी फाटा परिसरात रस्त्यावर पाण्याचे डबके थांबले असून, सर्वत्र घाण पसरली आहे. देवरी फाट्यावर ...
वरुर जऊळका: अकोट-अकोला मार्गावर असलेल्या देवरी फाटा परिसरात रस्त्यावर पाण्याचे डबके थांबले असून, सर्वत्र घाण पसरली आहे. देवरी फाट्यावर नेहमीच प्रवाशांची गर्दी असते. परिसरात पाण्याचे डबके साचल्याने अपघाताची शक्यता वाढल्याचे चित्र आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन पाण्याची विल्हेवाट लावण्याची मागणी होत आहे.
देवरी फाट्यावरून शेगाव, तेल्हारा, अकोला, अकोट आदी शहराला रस्ता जोडत असल्याने या फाट्यावर नेहमीच वर्दळ राहते. अकोट-अकोला रस्त्याचे काम सुरू असल्याने खड्ड्यांचे साम्राज्य वाढले आहे. त्यामुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. देवरी फाट्यावरही खड्ड्यांची निर्मिती झाली असून, या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे परिसरात डासांचे प्रमाण वाढले आहे. या परिसरात बऱ्याच हॉटेल असून, दुर्गंधी पसरली आहे. परिणामी हॉटेल विक्रीच्या व्यवसायावर परिणाम होत असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत माहिती देऊनही अद्याप खड्डे बुजविण्यात आले नसल्याचे चित्र आहे.
---------------------------------
देवरी फाट्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. डासांमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच खड्ड्यांमुळे अपघाताची भीती वाढली आहे.
- गजानन गावंडे, देवरी फाटा.
---------------------------
रस्त्याचे काम संथगतीने सुरू असून, देवरी फाट्यावर खड्डे निर्माण झाले आहेत. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन खड्ड्यात मुरुम टाकून पाण्याची विल्हेवाट लावावी.
- सचिन फोकमारे, देवरी फाटा.