सेतू केंद्र संचालकावर फेकली शाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 02:54 AM2017-09-11T02:54:36+5:302017-09-11T02:54:42+5:30
सध्या जिल्हाभरात सेतू केंद्रांवर कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सेतू केंद्रांवर शेतकर्यांकडून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पैशांची मागणी होत आहे. शहरातील गोरक्षण रोडवरील नगर परिषद कॉलनीतील श्रीनाथ गळीतकर यांच्या सेतू केंद्रावरसुद्धा कर्जमाफीचा अर्ज भरून देण्यासाठी पैसे घेण्यात येत असल्याचे परिसरातील युवकांना समजताच, रविवारी सकाळी सेतू केंद्रावर आंदोलन केले आणि सेतू केंद्र संचालक व त्याच्या कर्मचार्यावर युवकांनी शाई फेकून निषेध नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : सध्या जिल्हाभरात सेतू केंद्रांवर कर्जमाफीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. या सेतू केंद्रांवर शेतकर्यांकडून ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी पैशांची मागणी होत आहे. शहरातील गोरक्षण रोडवरील नगर परिषद कॉलनीतील श्रीनाथ गळीतकर यांच्या सेतू केंद्रावरसुद्धा कर्जमाफीचा अर्ज भरून देण्यासाठी पैसे घेण्यात येत असल्याचे परिसरातील युवकांना समजताच, रविवारी सकाळी सेतू केंद्रावर आंदोलन केले आणि सेतू केंद्र संचालक व त्याच्या कर्मचार्यावर युवकांनी शाई फेकून निषेध नोंदविला.
गोरक्षण रोडवरील नगर परिषद कॉलनीमध्ये सेतू केंद्र आहे. या सेतू केंद्रावर कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकरी गर्दी करीत आहेत. या सेतू केंद्रातील कर्मचारी शेतकर्यांकडून अर्ज भरण्यासाठी पैसे उकळत असल्याची माहिती परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांंना मिळाली. त्यांनी रविवारी सेतू केंद्रावर जात, सेतू केंद्र संचालक श्रीनाथ गळीतकर याला जाब विचारला आणि शासनाच्या नियमानुसार शेतकर्यांकडून पैसे घेता येत नाही. असे असतानाही सेतू केंद्रातील कर्मचारी शेतकर्यांकडून पैसे कसे काय घेतात, असा प्रश्न उपस्थित केला; परंतु केंद्र संचालकाला कोणतेही उत्तर देता आली नाही. यावेळी कार्यकर्त्यांनी सोबत आणलेल्या बाटलीतील शाई सेतू केंद्र संचालकासह त्याच्या कर्मचार्यांच्या अंगावर फेकली आणि त्याला शेतकर्यांकडून पैसे न घेण्याबाबत ताकीद देण्यात आली. यावेळी निशिकांत बडगे, बंटी आंबुस्कर, आकाश सोनोने, भूषण गणोजे, तुषार इटोले, ऋषिकेश जाधव, तुषार देशमुख, प्रवीण सोनोने, महेश आगरकर, चेतन सोमाणी आदी युवक सहभागी झाले होते.