रस्त्यात खिळे टाकून वाहने केली पंक्चर; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:18 AM2021-03-15T04:18:00+5:302021-03-15T04:18:00+5:30
खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाणेअंतर्गत येत असलेल्या पिंपळखुटा येथे रस्त्यात खिळे टाकून सात वाहने पंक्चर केल्याची घटना ...
खेट्री : पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस ठाणेअंतर्गत येत असलेल्या पिंपळखुटा येथे रस्त्यात खिळे टाकून सात वाहने पंक्चर केल्याची घटना रविवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. यामध्ये सहा ट्रॅक्टर व एक मालवाहू वाहनाचे नुकसान झाले. या प्रकरणी दिलेल्या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळखुटा येथे ट्रॅक्टर व इतर वाहने मातीची वाहतूक करीत होती. गावातीलच मिलिंद शेषराव वानखेडे यांनी फाटक्या चपलेमध्ये तीन ते चार इंचांचे खिळे टोचून वाहनांचे नुकसान व्हावे, या हेतूने रस्त्यात टाकले. त्यामुळे सहा ट्रॅक्टर व एक मालवाहू वाहन अशी एकूण सात वाहने पंक्चर झाल्याने जवळपास सहा हजारांचे नुकसान झाले आहे. यापूर्वीसुद्धा मिलिंद शेषराव वानखेडे यांनी असा प्रकार केल्याची माहिती आहे. रविवारी घडलेल्या प्रकरणी ट्रॅक्टरमालकांनी थेट चान्नी पोलीस ठाणे गाठले. गोपाल सदाशिव पानझाडे यांच्या फिर्यादीवरून चान्नी पोलिसांनी आरोपी मिलिंद शेषराव वानखेडे यांच्याविरुद्ध भादंविच्या ४२७,५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. वृत्त लिहीपर्यंत आरोपीला अटक करण्यात आली नव्हती. पुढील तपास चान्नी पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनात बाळकृष्ण येवले करीत आहे. (फोटो)