फुंडकरांनी प्रतिज्ञापत्रात माहिती दडवली!
By admin | Published: June 20, 2016 02:03 AM2016-06-20T02:03:25+5:302016-06-20T02:03:25+5:30
माजी आमदार सानंदा यांचा आरोप
खामगाव: विधान परिषदेच्या निवडणुकीत उभे राहण्याकरिता आमदार भाऊसाहेब फुंडकर यांनी १0 मार्च २0१४ रोजी सादर केलेल्या स्वत:च्या शपथपत्रामध्ये राज्य सहकारी बँकेसंबंधी व त्यांच्यावर दाखल असलेले इतर गुन्हे लपविल्याचा आरोप माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केला आहे.
राज्य सहकारी बँकेतील १६00 कोटी रुपयांच्या घोटाळा प्रकरणात तत्कालीन अध्यक्ष माणिकराव पाटील यांच्यासह आजी, माजी ७६ संचालकांना दोषी ठरवून त्यांच्यावर आर्थिक जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. या प्रकरणात आमदार भाऊसाहेब फुंडकरांवर ४ कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित करण्यात आल्याचेही माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
राज्य सहकारी बँकेतील १६00 कोटी रुपयांच्या कथित घोटाळा प्रकरणात सन २00१ मध्ये रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार राज्य सरकारने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून चौकशीचा आदेश दिला होता. या घोटाळ्याच्या प्राथमिक चौकशीत तत्कालीन संचालक मंडळ दोषी असल्याचा ठपका ठेवण्यात आला असून, सहकार विभागाने सहकार कायद्याच्या कलम ८८ अन्वये दोषी संचालकांवर नुकसानाची जबाबदारी निश्चित केली. या संस्थेत त्यावेळी संचालक म्हणून भाऊसाहेब फुंडकर असल्यामुळे त्यांच्यावरही ४ कोटी रुपयांची जबाबदारी निश्चित झाली आहे. तसेच निवडणुकीसाठी खोटे प्रतिज्ञापत्रही फुंडकरांनी दाखल केल्याचा आरोपही माजी आमदार सानंदा यांनी केला आहे.