होमक्वारंटीन असलेला कोरोनाबाधित रुग्ण घराबाहेर पडल्यास दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:17 AM2021-05-17T04:17:29+5:302021-05-17T04:17:29+5:30
राहूल सोनोने दिग्रस बु : पातूर तालुक्यातील सस्ती येथील वाढता कोरोना प्रादभाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात सस्ती ...
राहूल सोनोने
दिग्रस बु : पातूर तालुक्यातील सस्ती येथील वाढता कोरोना प्रादभाव लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशात सस्ती गाव ‘रेड झोन’मध्ये असून, गावांच्या सीमा रविवारी सील करण्यात आल्या आहेत. गावात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रा.पं. प्रशासनाने पुढाकार घेतला असून, होमक्वारंटीन असलेला कोरोनाबाधित रुग्ण घराबाहेर फिरताना दिसून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने तसे सूचित केले आहे.
जिल्ह्यासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. पातूर तालुक्यातील सस्ती येथे सद्यस्थितीत २२ कोरोनाबाधित रुग्ण होमक्वारंटाईनमध्ये असून, त्यांच्यावर ग्रा.पं. प्रशासन वॉच ठेवून आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, सस्ती येथे बसस्थानक परिसरात प्रवेशद्वार बंद करण्यात आले असून, पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी ग्रा.पं.ने पुढाकार घेतला असून, होमक्वारंटाइन असलेला रुग्ण घराबाहेर पडल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. याबाबत ग्रा.पं. प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्रात फलक लावले आहे. यावेळी सरपंच द्वारकाबाई मेसरे, ग्रामसचिव संतोष घोडके, ग्रामपंचायत सदस्य सुनील बंड, संतोष लासुरकर, संजय ताले, शेख इमाम, मीनाक्षी डाबेराव, नाना अंभोरे, ग्रामपंचायत कर्मचारी सुभाष लसुरकर, सुनील जी. बंड, सुनील महल्ले, अमोल ताले आदी उपस्थित होते.
-----------------
रुग्णाला ५०० रुपये, तर दुकानदाराने नियम मोडल्यास एक हजार रुपये दंड
सस्ती ग्रामपंचायतमार्फत कोरोनाबाधित रुग्ण बाहेर फिरल्यास ५०० रुपये दंड व कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच विना मास्क फिरणाऱ्यांना २०० रुपये दंड, किराणा दुकानात ग्राहक दिसल्यास व ११ वाजतानंतर दुकान उघडे दिसल्यास एक हजार रुपये दंड वसूल करण्यात येणार आहे.