मनपा करणार फॉगिंग मशीनची खरेदी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 01:28 AM2017-10-11T01:28:40+5:302017-10-11T01:29:08+5:30
अकोला : उशिरा का होईना, अखेर महापालिका प्रशासनाने धुरळणीसाठी फॉगिंग मशीन खरेदीचा निर्णय घेतला. मागील दहा वर्षांपासून हिवताप विभागाकडे केवळ सहा मशीन उपलब्ध होत्या. तेव्हापासून मशीन खरेदीसाठी कोणी पुढाकारच घेतला नाही. ‘लोकमत’ने डासांची वाढलेली पैदास व अकोलेकरांच्या आरोग्याचा मुद्दा सातत्याने लावून धरल्यानंतर महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी २0 मशीन खरेदीसाठी निविदा मागविण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : उशिरा का होईना, अखेर महापालिका प्रशासनाने धुरळणीसाठी फॉगिंग मशीन खरेदीचा निर्णय घेतला. मागील दहा वर्षांपासून हिवताप विभागाकडे केवळ सहा मशीन उपलब्ध होत्या. तेव्हापासून मशीन खरेदीसाठी कोणी पुढाकारच घेतला नाही. ‘लोकमत’ने डासांची वाढलेली पैदास व अकोलेकरांच्या आरोग्याचा मुद्दा सातत्याने लावून धरल्यानंतर महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी २0 मशीन खरेदीसाठी निविदा मागविण्याचा निर्णय घेतला आहे.
परतीच्या पावसामुळे शहरात विविध ठिकाणी पाणी तुंबले आहे. हा प्रकार कमी म्हणून की काय, खुल्या भूखंडांवर बाराही महिने सांडपाण्याची समस्या दिसून येते. साफसफाईच्या कामांचा पुन्हा एकदा बोजवारा उडाल्यामुळे प्रभागांमध्ये घाणीचे ढीग साचले आहेत. परिणामी, डासांची पैदास वाढली असून, नागरिकांना आजारांचा सामना करावा लागत असल्याची परिस्थिती आहे. सर्दी, डोकेदुखी, अंगदुखी, खोकला व तापेने अकोलेकर फणफणल्याचे चित्र आहे. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांची प्रचंड गर्दी दिसून येते. अकोलेकरांचे आरोग्य धोक्यात असताना महापालिकेच्या मलेरिया (हिवताप) विभागाला सोयरसूतक नसल्याचे दिसून येते. हद्दवाढीमुळे शहराचा विस्तार वाढला. नवीन प्रभागांमध्ये मूलभूत सुविधांची वानवा असून, साचलेले पाणी व डासांमुळे नागरिक त्रस्त आहेत. सुमारे साडेपाच लाख लोकसंख्येच्या शहरात डासांचा प्रकोप रोखण्यासाठी मलेरिया विभागाकडे अवघ्या सहा धुरळणी व १४ ते १५ फवारणी मशीन उपलब्ध आहेत. मलेरिया विभागाने प्रभागांमध्ये नियमित धुरळणी आणि फवारणी करणे क्रमप्राप्त असताना या विभागाचे कर्मचारी दिवसभर असतात कुठे, असा सवाल उपस्थित होतो. धुरळणीसाठी या विभागाने मागील दहा वर्षांपासून नवीन मशीनची खरेदीच केली नाही. धुरळणी व फवारणीसाठी लागणारे औषध आरोग्य उपसंचालक कार्यालयामार्फत प्राप्त होत असल्याने सदर औषधांचा तुटवडा भासण्याचा प्रश्न निर्माण होत नाही. अशा स्थितीत सहा मशीनवर २0 प्रभागांमध्ये नियमित धुरळणी कशी होऊ शकते, असा सवाल ‘लोकमत’ने उपस्थित केला होता. या बाबीची दखल घेत महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी २0 फॉगिंग मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेत निविदा मागविल्या. सदर निविदा प्रशासनाला प्राप्त झाल्या असून, त्यावर प्रशासनाकडून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.
हिवताप विभागाचा कारभार हवेत!
हिवताप विभागाच्या अखत्यारीत असलेल्या जीवशास्त्रज्ञ डॉ. विजया मोडक यांची उचलबांगडी केल्यानंतर हे पद रिक्त आहे, तर पर्यवेक्षकाला निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर या विभागाचा प्रभार वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख यांच्याकडे होता. डॉ. शेख निलंबित झाल्यामुळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अस्मिता पाठक यांच्याकडे प्रभार सोपवण्यात आला. या परिस्थितीचा फायदा विभागातील कर्मचारी घेत असल्याने हिवताप विभागाचा कारभार हवेत सुरू असल्याचे दिसून येते.