पितृपक्षातही खरेदी जोरात; जुन्या चालीरीतींना फाटा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:21 AM2021-09-23T04:21:17+5:302021-09-23T04:21:17+5:30
सोमवारपासून पितृपक्ष सुरू झाला आहे. पितृपक्षात पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात, अशी श्रद्धा आहे. पितृपक्षाचे १५ दिवस वाईट मानले जातात. ...
सोमवारपासून पितृपक्ष सुरू झाला आहे. पितृपक्षात पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात, अशी श्रद्धा आहे. पितृपक्षाचे १५ दिवस वाईट मानले जातात. या काळात सोने, घर तसेच मौल्यवान वस्तूंची खरेदी-विक्री केली जात नाही. विवाहाचे मुहूर्तही टाळले जातात. परंतु, या जुन्या चालीरीतींना फाटा देण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. पितृपक्षातच अधिकतम घाऊक व्यापारी खरेदी करण्यासाठी बाहेर पडतात. नवरात्र आणि दिवाळीची खरेदी करण्यासाठी हा ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला काळ असतो.
व्यावसायिक म्हणतात...
पितृपक्षामध्ये नागरिक खरेदीसाठी टाळाटाळ करायचे; परंतु आता उलट खरेदीकडे ओढा वाढला आहे. बहुतांश नागरिकांमध्ये परिवर्तन झाले आहे. गर्दी कमी असल्याने पसंतीची वस्तू घेता येते आणि दरातही कमतरता राहते.
- शैलेश खरोटे, सराफा व्यावसायिक
आधी पितृपक्षात खरेदी टाळत होते. आता बहुतांश नागरिक पितृपक्षातही खरेदी करतात. या काळात काही प्रमाणात खरेदीचे प्रमाण कमी होते. यंदा गणेशोत्सवादरम्यानही ग्राहकांचे प्रमाण कमी दिसून आले.
- श्रीराम मित्तल, इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिक
पितृपक्षात व्यावसायिक नवीन मालाची खरेदी करतात. नवरात्रात नवीन माल येणार असल्याने या दृष्टिकोनातूनही बहुतांश लोक खरेदी टाळतात; मात्र दैनंदिन लागणाऱ्या कपड्यांची या काळात खरेदी सुरूच असते.
- गौतम भैया, साडी व्यावसायिक
पितृपक्षात अनेकजण खरेदी निषिद्ध मानतात. त्यामुळे या काळात क्वचितच लोक दुचाकीची खरेदी करतात. या दिवसांमध्ये ग्राहकांकडून प्रतिसाद कमी राहतो. नवरात्रीपासून ऑटोमोबाइल व्यवसायाला चालना मिळते.
- चेतन व्यास, ऑटोमोबाइल व्यावसायिक
आता काळानुसार बदल होत आहे. कोणत्याही व्यक्तीला आपले काम बंद राहावे असे वाटत नाही. या काळातही फनिर्शिंगचे मटेरियल येणे सुरूच असते. फोम, पडद्याचे कपडे, आदी साहित्य खरेदी-विक्री सुरूच राहते.
- अक्षय बाकलीवाल, घर सजावट साहित्य व्यावसायिक