‘ते’ कंत्राटदार काळ्या यादीत टाका! - महापौरांनी दिले निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2019 12:32 PM2019-06-29T12:32:40+5:302019-06-29T12:32:46+5:30
जे कंत्राटदार कामाचे आदेश घेऊनसुद्धा वर्षभर काम करणार नाही त्यांना काळ्या यादीत टाकण्यासाठीचे प्रस्ताव महासभेत पाठविण्याबाबतच्या सूचना महापौर विजय अग्रवाल यांनी दिल्या.
अकोला-महानगरपालिका क्षेत्रांतर्गत बांधकाम विभागामार्फत सुरू असलेल्या कामांसदर्भात ज्या कंत्राटदारांनी एक वर्ष होऊनसुद्धा कार्यादेश घेतला नाही, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, तसेच जे कंत्राटदार कामाचे आदेश घेऊनसुद्धा वर्षभर काम करणार नाही त्यांना काळ्या यादीत टाकण्यासाठीचे प्रस्ताव महासभेत पाठविण्याबाबतच्या सूचना महापौर विजय अग्रवाल यांनी दिल्या.
महापौरांच्या दालनात झालेल्या या बैठकीत त्यांनी विकास कामांच्या स्थितीबाबत आढावा घेतला. यावेळी नगरसेवक अमोल गोगे, हरीश काळे, सुनील मेश्राम, विलास शेळके, सागर शेगोकार, पूर्व, पश्चिम, रवींद्र भंसाली, श्याम विंचनकर, देवराव अहीर, उत्तर व दक्षिण झोनचे उपअभियंता कृष्णा वाडेकर, अनिल गावंडे, युसूफ खान व अरुण उजवणे, राजू सरप, योगेश मारवाडी यांच्यासह सर्व कनिष्ठ अभियंत्यांची उपस्थिती होती.
नगरोत्थान, दलितेत्तर, दलित वस्ती अंतर्गत प्राप्त निधीमधील कामांची प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रियेची स्थिती, कामे कोणती सुरू आहेत. ज्यांना कार्यादेश दिला आहे त्यांनी काम न सुरू केल्यास काय कारवाई केली, आदींबाबत महापौरांनी अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली, तसेच कोणती कामे प्रगतीपथावर आहेत किंवा कोणत्या कामांचे कार्यादेश देऊनसुद्धा संबंधित कंत्राटदारांनी अद्यापपर्यंत कामे सुरू केलेली नाहीत, याबाबत विचारणा केली, तसेच ज्या प्रभागामध्ये अभियंत्यांची कमतरता आहे, त्या प्रभागात अभियंत्यांची कंत्राटी पद्धतीने नियुक्ती करण्यात येईल, असे सांगितले.
तातडीने कामे पूर्ण करा!
पूर्व झोनमध्ये १७ कामे, उत्तर झोनमध्ये १० कामे व दक्षिण झोनमध्ये ७ कामे अशी एकूण ३५ कामे प्रलंबित असल्याचे आढावा बैठकीत समोर आल्यावर महापौर अग्रवाल यांनी संबंधित कंत्राटदारांना तातडीने कामे पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. महानगरपालिकेस शासनाकडून रु.१५ कोटी निधी मिळू शकतो, याकरिता प्राथमिकता ठरवून नाले कामांची यादी तयार करण्याबाबतही त्यांनी निर्देश दिले.