प्राणघातक हल्ला करणाऱ्या पुतण्यास पाच वर्षांचा कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:23 AM2021-02-17T04:23:39+5:302021-02-17T04:23:39+5:30
अकोला: पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या विराहीत येथे क्षुल्लक कारणावरून काकावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ...
अकोला: पिंजर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या विराहीत येथे क्षुल्लक कारणावरून काकावर प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या पुतण्यास जिल्हा व सत्र न्यायालयाने मंगळवारी पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच दहा हजार रुपयांचा दंडही न्यायालयाने आरोपीला ठोठावला आहे. मुकिंदा विजय राऊत असे आरोपीचे नाव आहे.
विराहित येथील रहिवासी भाऊराव गुलाबराव राऊत यांच्याशी आरोपी मुकिंदा विजय राऊत याने २० एप्रिल २०१७ रोजी क्षुल्लक कारणावरून वाद घातला. भाऊराव राऊत यांनी त्यास प्रतिसाद न दिल्याने मुकिंदा राऊत याने त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी प्राणघातक हल्ला केला. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी दिली; मात्र ग्रामस्थांनी हा वाद तातडीने मिटवून जखमीला मूर्तिजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पिंजर पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून जखमीचे बयान नोंदविले. तसेच भाऊराव राऊत यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी मुकिंदा विजय राऊत यांच्याविरोधात पिंजर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला. त्यानंतर या प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस अधिकारी सुनील सोळुंके यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू झाल्यानंतर दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपी मुकिंदा राऊत यास भारतीय दंड विधानाच्या कलम ३०७ अन्वये पाच वर्षांची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला, दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान केले आहे. तसेच भारतीय दंड विधानाच्या कलम ५०६ अन्वये एक वर्षाची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास अतिरिक्त शिक्षेचे प्रावधान न्यायालयाने केले आहे.