कोरोनाबाधित गर्भवतीच्या संपर्कात आलेल्या तीन परिचारिकांना केले क्वारंटीन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 05:23 PM2020-05-08T17:23:28+5:302020-05-08T17:23:53+5:30
महिलेच्या संपर्कात आलेल्या तीन परिचारिकांना गुरुवारी क्वारंटीन करण्यात आले आहे.
अकोला : जिल्हा स्त्री रुग्णालयात बुधवारी अकोट फैल परिसरातील एका महिलेचा वैद्यकीय चाचणी अहवाल प्रसूती झाल्यानंतर पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या महिलेच्या संपर्कात आलेल्या तीन परिचारिकांना गुरुवारी क्वारंटीन करण्यात आले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जगभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टरही यामुळे आपला जीव धोक्यात घालत आहेत. तर दुसरीकडे संबंधित प्रशासन अकोला जिल्हा महिला रुग्णालय आणि सर्वोपचार रुग्णालयातील डॉक्टरांना पीपीई किट देण्यास असमर्थ ठरत आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध होत नसल्याने त्यांना आपले कर्तव्य बजावण्यात अडचणी येत आहेत. जिल्हा स्त्री रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे गरजेच्या तुलनेत कमी सुरक्षा साधन असल्याने त्यांच्या आरोग्यासाठी धोका वाढत आहे. असाच काहिसा प्रकार येथील तीन परिचारिकांसोबत झाला असून, कोरोनाबाधित महिलेच्या प्रसूतीदरम्यान त्या महिलेच्या संपर्कात आल्या आहेत. त्यामुळे संभाव्य धोका पाहता, तिन्ही परिचारिकांना क्वारंटीन करण्यात आले आहे.