खात्यातून काढले सव्वा लाख रुपये, शेतमजुर अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 10:53 AM2020-09-09T10:53:00+5:302020-09-09T10:53:10+5:30
१ लाख २५ हजार रुपये त्याच्या बँक खात्यात जमाही झाले होते; मात्र लाभार्थ्याच्या हातात एक रुपयाही आला नाही.
खिरपुरी:बाळापूर तालुक्यातील खिरपुरी येथे शेतीकामासाठी मध्यप्रदेशातून आलेल्या कोरकूसमाजाच्या शेतमजुरावर वन्य प्राण्याने हल्ला केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला होता. मदत म्हणून १ लाख २५ हजार रुपये त्याच्या बँक खात्यात जमाही झाले होते; मात्र लाभार्थ्याच्या हातात एक रुपयाही आला नाही. अन्य व्यक्तिंनी परस्पर सदर खात्यातून एटीएमद्वारे रक्कम काढून आपल्याला लुबाडल्याचा आरोप शेतमजूर गणेश बारस्कार याने निवेदनाद्वारे केला आहे. आपली रक्कम परत न मिळाल्यास आत्मदहनाचा इशाराही त्याने सदर निवेदनात दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,
पश्चिम विदर्भात शेतीकामासाठी मजूर मिळेनासे झाल्यामुळे मध्यप्रदेशातील मजूर शेतीकामासाठी इकडे येत असतात. गणेश संतु बारस्कार हा मध्यप्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील लायवाणी येथील रहिवासी. मागील वर्षी तो बाळापूर तालुक्यातील खिरपुरी परिसरात शेतीकाम करीत असताना त्याच्यावर वन्य प्राण्याने हल्ला केला होता. परिणामी, तो गंभीर जखमी झाल्यामुळे त्याला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला खिरपुरी व टाकळी खुरेशी येथील दोन व्यक्तिंनी शासकीय अनुदान मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार त्याचा अर्ज करण्यात आला. त्याचे ३०.०९.२०१९ ला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या व्याळा शाखेत खाते उघडण्यात आले. त्यावर मोबाइल नंबर या दोघांपैकीच एकाचा देण्यात आला. यावर्षी एप्रिलमध्ये त्याच्या खात्यात १ लाख २५ हजार रुपये वन विभाग खात्याकडून जमा करण्यात आले; मात्र लाभार्थ्याला काहीही माहिती न देता त्याचे एटीएम कार्ड या दोघांनी बँकेकडून मिळविले. एटीएमद्वारे त्यांनी ४ एप्रिल २०२० ला १० हजार रुपयांचे दोन विड्रॉल, ६ एप्रिल २०२० ला १० हजार रुपयांचे दोन विड्रॉल, ७ एप्रिल २०२० ला १० हजार रुपयांचे दोन विड्रॉल, ९ एप्रिल २०२० ला १० हजार रुपयांचे दोन विड्रॉल, २२ मे २०२० ला १० हजार रुपयांचे दोन विड्रॉल आणि १० आॅगस्ट २०२० ला ३ हजार रुपयांचा विड्रॉल करण्यात आला. असे एकूण त्याच्या खात्यातील रक्कम या दोघांनी लुबाडल्याचा त्याने आरोप केला आहे. गरिबाचा घास अन्य भामट्यांनी ओरबडून नेल्याचे त्याला काही दिवसांआधी समजताच त्याने चौकशी केली; मात्र त्याला प्रतिसाद मिळाला नाही. सदरकामी या दोघांना व्याळा येथील तत्कालीन जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा व्यवस्थापक ढोले यांनीही मदत केल्याचा आरोप सदर शेतमजुराने आपल्या निवेदनात केला आहे. या प्रकरणात अकोला उप-वनसंरक्षक कार्यालयातील एसीएफ वडोदे यांनीही पैसे घेतल्याचा आरोप सदर शेतमजुराने केला आहे. आपली रक्कम परत न मिळाल्यास वडोदे यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशाराही त्याने दिला आहे. सदर प्रकरण अतिशय गंभीर असून, याची प्रशासनाने गंभीर दखल घेणे आवश्यक आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून सदर शेतमजुराला न्याय मिळावा, याकरिता शासनाने प्रामाणिक प्रयत्न करावे, अशी मागणी शेतमजुरांनी केली आहे. (वार्ताहर)