मायक्रो फायनान्सप्रकरणी तपासावर प्रश्नचिन्ह
By admin | Published: March 11, 2017 01:59 AM2017-03-11T01:59:01+5:302017-03-11T01:59:01+5:30
केंद्राच्या अखत्यारीतील कंपन्यांचा गुन्हे शाखेकडून तपास.
संजय खांडेकर
अकोला, दि. १0-विदर्भातील अनेक मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज वसुलीचा अतिरेक होत असून हजारो तक्रारींचा तपास अधांतरी सापडला आहेत्र. यासंदर्भात आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित केला असून दुसरीकडे विदर्भातील आणि अकोला गुन्हे शाखेची यंत्रणा संबंध नसलेल्या कार्यालयांची चौकशी करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे मायक्रो फायनान्सप्रकरणी तपासावरच प्रश्नचिन्ह लागले आहेत.
विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोदिंया या ११ जिल्हय़ातील हजारो महिला बचत गटांना खासगी मायक्रो फायनान्सने कोट्यवधींचे कर्ज वितरित केले. नोटाबंदीच्या दरम्यान कर्जाची वसुली करण्यासाठी कंपन्यांच्या अधिकारी आणि कर्मचार्यांकडून पठाणी पद्धत राबविण्यात आली. ग्रामिण परिसरातील गोरगरीब महिलांनी संबंधित जिल्हाधिकार्यांकडे हजारो तक्रारी नोंदविल्यात. यापैकी अकोल्यातही ३४४ तक्रारी नोंदवून महिलांनी एकत्रित येऊन मोर्चादेखील काढला; असाच प्रकार राज्यभर झाला. या प्रकाराची गंभीर दखल घेत आमदार विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत तारांकित प्रश्न क्र. ७४00२ उपस्थित केला. त्यामुळे विदर्भातील पोलीस यंत्रणेकडून तपास सुरू झाला आहे. अकोल्यातील स्थानिक गुन्हे शाखेने जिल्हा अग्रणी बँकेकडे याबाबत २८ मुद्यांभोवती सहा प्रश्नांची उत्तरे मागितली. मुळात पोलिसांकडून उपस्थित झालेले प्रश्न चुकीचे आणि त्यातही ज्या कार्यालयास ही विचारणा करण्यात आली ती कार्यालये देखील चुकली आहे. मायक्रो फायनान्सच्या सर्व आर्थिक व्यवहारांची मान्यता केंद्र शासनाच्या अखत्यारीतील आहे. राज्याचादेखील यामध्ये संबंध नाही. असे स्पष्टीकरण जिल्हा अग्रणी बँकेच्या सुत्रांनी दिले. जिल्हा अग्रणी बँकेने याबाबत स्पष्टपणे उत्तर दिल्याने आता चौकशी तरी कोठे करावी, याबाबत पोलिसांसमोर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.त्यामुळे मायक्रो फायनान्सप्रकरणी तपासावरच प्रश्नचिन्ह लागले आहेत.