अकोला जिल्ह्यात १.७२ लाख हेक्टरवर रब्बी पेरणीचे नियोजन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2019 03:15 PM2019-11-11T15:15:32+5:302019-11-11T15:15:46+5:30
पाऊस सुरूच असल्याने यंदा जिल्ह्यातील रब्बी पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.
अकोला : यावर्षीच्या रब्बी हंगामात जिल्ह्यात १ लाख ७२ हजार ८१० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे; परंतु अवकाळी पाऊस सुरूच असल्याने यंदा जिल्ह्यातील रब्बी पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत.
जिल्ह्यात २०१९-२० यावर्षीच्या रब्बी हंगामात पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील सातही तालुक्यांत १ लाख ७२ हजार ८१० हेक्टर क्षेत्रावर हरभरा, गहू, करडी, सूर्यफूल, ज्वारी, मका व इतर रब्बी पिकांची पेरणी करण्यात येणार आहे. पावसाळा संपल्यानंतर महिना उलटून गेला; मात्र महिनाभरापासून सुरू असलेला अवकाळी पाऊस सुरूच असल्याने, जिल्ह्यात सर्वत्र शेतांमध्ये पाणी साचले आहे. त्यामुळे रब्बी पिकांच्या पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. अवकाळी पाऊस थांबल्यानंतर आणि शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर येत्या पंधरा दिवसांत जिल्ह्यात रब्बी पिकांच्या पेरण्या सुरू होण्याची शक्यता आहे.
रब्बी पेरणीचे असे आहे नियोजन!
रब्बी हंगामात जिल्ह्यात १ लाख ७२ हजार ८१० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये हरभरा -१ लाख १५ हजार हेक्टर, गहू -४६ हजार ५८० हेक्टर, रब्बी ज्वार-२०० हेक्टर, रब्बी मका -६२० हेक्टर, करडी-३ हजार ७६० हेक्टर, सूर्यफूल-२ हजार ६५० हेक्टर, कांदा-३ हजार हेक्टर व भाजीपाला-१ हजार हेक्टर इत्यादी पीक पेरणीचा समावेश आहे.
अवकाळी पाऊस सुरू असल्याने, शेतात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे रब्बी पेरणीसाठी शेतीच्या मशागतीची कामे थांबली असल्याने, रब्बी पिकांची पेरणी लांबणीवर पडली आहे. पाऊस थांबल्यास शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर येत्या पंधरा दिवसांत रब्बी पिकांची पेरणी सुरू होणार आहे.
-शिवाजीराव भरणे,
शेतकरी, रामगाव, ता. अकोला.