रब्बी पिकांना गारपीटचा फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 03:49 PM2019-04-17T15:49:10+5:302019-04-17T15:49:37+5:30
अकोला : वादळीवारा आणि गारपीटसह झालेल्या अवकाळी पावसाने बार्शीटाकळी, मूर्तिजापूर आणि पातूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
अकोला : वादळीवारा आणि गारपीटसह झालेल्या अवकाळी पावसाने बार्शीटाकळी, मूर्तिजापूर आणि पातूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बार्शीटाकळी तालुक्यामध्ये दोनद खु., उजळेश्वर, राहीत, साहीत येथे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
बार्शीटाकळी : तालुक्याला १६ एप्रिलच्या सायंकाळी ४ वाजताच्या दरम्यान वादळी पावसासह गारपिटीने झोडपल्याने रब्बी, फळबाग व भाजीपाला पिके भुईसपाट झाली. अवघ्या २० ते २५ मिनिटात होत्याचे नव्हते झाले. तालुक्यातील शेलगाव, बोरमळी, शेलु खु., मोझरी बु., पुनोती, उजळेश्वर, तिवसा, राहित, साहित, दोनद आदी ठिकाणी तुफान गारपीट व वादळी पाऊस झाल्याने लाखो रुपयांची हानी झाली. शेलु खु. येथील कैलास महल्ले, उल्हास महल्ले, सुभाष महल्ले, भास्कर काकड या शेतकऱ्यांचे लिंबु, भाजीपाला, बीजोत्पादन, कांदा आदी पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. उजळेश्वर येथील शेतकºयाची पपईची फळबाग भुईसपाट झाली. पुनोती परिसरात आंब्याचे नुकसान झाले. पुनोती परिसरात जबरदस्त पावसासह गारपीट झाली आहे. इतर तालुक्याच्या भागात पाऊस झाला आहे. राहीत येथील सचिन चव्हान, मनोज देशमुख, तेजराव वाहुरवाघ, धनंजय देशमुख, अरूण देशमुख, अंबादास वाहुरवाघ, पुनोती येथील रवींद्र सावरकर, सुनील घोंगे, रामचंद्र काकड, वेणु इंगळे यांचे कांदा बीजोत्पादन प्लॉट गारपिटीने उद्ध्वस्त झाला असून, लाखोंचे नुकसान झाले आहे. राहीत येथील मनोज देशमुख यांचे गव्हाचे पीक गारपिटीने उद्ध्वस्त झाले आहे.
निवडणुकीमुळे पंचनामे पुढे ढकलले
अकोला लोकसभा मतदार संघासाठी १८ एप्रिल रोजी मतदान होणार असून, प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. आज मतदान केंद्रावर कर्मचारी रवाना होणार असल्याने वादळी पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या पीक नुकसानाचे महसूल व कृषी विभागाकडून पंचनामे करण्यात येणार नाहीत. ही वस्तुस्थिती दिसत आहे.
पीक नुकसानाची माहिती मिळाली; परंतु महसूल कर्मचारी, अधिकारी हे १७ एप्रिल रोजी निवडणुकीच्या कामासाठी मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत. त्यामुळे पंचनामे होणे शक्य नाही, तरीही आवश्यकतेनुसार पंचनामे करण्याचा प्रयत्न करू.
- गजानन हामंद,तहसीलदार, बार्शीटाकळी.