खारपाणपट्ट्यात रब्बी ज्वारीचे क्षेत्र वाढणार -कुलगुरू भाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 01:48 PM2018-03-14T13:48:16+5:302018-03-14T13:48:16+5:30
अकोला : शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न कसे वाढेल, यावर कृषी विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले असून, खारपाणपट्ट्यात रब्बी ज्वारीचे क्षेत्र वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करणार असल्याचे आश्वासन डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. एम. भाले यांनी शेतकऱ्यांना दिले.
खारपाणपट्ट्यात शेती दिनाचे आयोजन करण्यात येत असून, चंडिकापूर येथे सोमवारी शेती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या ठिकाणी शेती व ज्वारी दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी संशोधन संचालक डॉ. व्ही.के. खर्चे, ज्वारी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. आर.बी. घोराडे, डॉ. शशांक भराड, डॉ. अनिल गुल्हाने, डॉ. व्ही.यू. सोनाळकर, डॉ. सीमा नेमाडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्यावेळी बोलताना डॉ. भाले यांनी ज्वारीचे वाढलेले महत्त्व विशद केले. ते म्हणाले, ज्वारी दिन साजरा करू न ज्वारी लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये सकारात्मकता वाढावी, शेतकऱ्यांच्या शेतात घेतलेले प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरावे, यादृष्टीने कृषी विद्यापीठ काम करीत आहे. ज्वारी पिकांचा उत्पादन खर्च कमी असून, ज्वारीसोबतच कडबा असे दुहेरी पीक असल्याने नफा चांगला आहे. पीकेव्ही क्रांती हा रब्बीतील सरळ वाण असल्यामुळे शेतकरी स्वत:चे बियाणे तयार करू शकतो, त्यामुळे या पिकाकडे शेतकऱ्यांनी वळावे, असे आवाहन त्यांनी केले.