रब्बीचा हंगाम धोक्यात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 01:42 AM2017-10-13T01:42:49+5:302017-10-13T01:42:58+5:30
हातरूण : यावर्षी दमदार पावसाने हुलकावणी दिल्याने शेतशिवारातील शेततळय़ात पाण्याचा ठणठणाट आहे. हजारो रुपये खर्च करून साकारलेली शेततळी कोरडी पडल्याने, रब्बीचा हंगाम धोक्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हातरूण : यावर्षी दमदार पावसाने हुलकावणी दिल्याने शेतशिवारातील शेततळय़ात पाण्याचा ठणठणाट आहे. हजारो रुपये खर्च करून साकारलेली शेततळी कोरडी पडल्याने, रब्बीचा हंगाम धोक्यात आला आहे.
महाराष्ट्र शासनाने कृषी विभागामार्फत ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेमार्फत शेततळी निर्माण करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचे अनुदान दिले. दुष्काळावर मात करण्यासाठी शेततळे उपयुक्त असल्याने राज्यातील पर्जन्यावर आधारित कोरडवाहू शेतीसाठी पाणलोट व जलसंवर्धन माध्यमातून जलसिंचनाची उपलब्धता वाढविणे, तसेच संरक्षित व शाश्वत सिंचनाची सुविधा निर्माण करण्यासाठी ‘मागेल त्याला शेततळे’ योजना कृषी विभागाने हातरुण शिवारात राबवली. कृषी विभागाच्या अधिकार्यांनी हातरुण, शिंगोली, मालवाडा, दुधाळा, बोरगाव वैराळे, अंदुरा, खंडाळा, लोणग्रा, मांजरी शेतशिवारात तालुका कृषी अधिकारी शशिकिरण जांभरूणकर आणि कृषी सहाय्यक गावित यांच्या प्रयत्नाने शेकडो शेततळी साकारली.
शेतजमिनींच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून शेततळ्यात साठवण्यात येते. आपत्कालीन परिस्थितीत पिकास पाणी उपलब्ध होण्यासाठी शेततळे गतवर्षी वरदान ठरली होती. पावसाच्या अनियमितपणामुळे पिकांना पाण्याची गरज असते. नेमक्या त्याच वेळी या शेततळ्यात साठविलेल्या पाण्यामधून एक किंवा दोन पाणी पिकास देऊन उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून शेतकर्यांनी शेतात शेततळी निर्माण केली. मात्र, यावर्षी शेततळी कोरडी राहिल्याने शेततळ्यातील पाणी पिकांना देता येणार नाही. संरक्षित सिंचनासाठी, तसेच रब्बी पिकांनाही या शेततळ्यातील पाणी देता येऊ शकते. पण, यावर्षी तुरळक पावसाने हजेरी लावली. परिसरातील नदी आणि नाल्यांना पावसाळा संपल्यात जमा असला, तरी एकही पूर आला नाही. त्यामुळे गतवर्षी साकारलेली शेततळी पावसाच्या पाण्याने भरली नाही. त्यामुळे शेततळ्यात पाण्याचा ठणठणाट आहे. बाळापूर तालुक्यात कृषी विभागाच्या पुढाकाराने गतवर्षी १७0 शेततळी साकारली. सात प्रकारच्या वेगवेगळ्या आकाराची शेततळी शेतात निर्माण केली आहेत. गतवर्षी शेततळी पावसाच्या पाण्याने तुडुंब भरली होती. यावर्षी मात्र शेततळ्यात पाण्याचा पत्ताच नाही. यावर्षी उडीद व मुगाच्या पिकाचे उत्पादन घटल्याने, रब्बीचे क्षेत्र वाढणार आहे.
रब्बी पिकाला पाण्याची गरज असल्यास शेतकरी शेततळ्यातील पाणी पिकाला देतात. मात्र यावर्षी शेततळ्यात पाणीच नसल्याने रब्बीच्या पिकाला पाण्याची गरज लागल्यास पाणी कोठून द्यावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
४५ शेततळ्यांचे अनुदान कधी?
बाळापूर कृषी विभागाच्या पुढाकाराने साकारलेल्या १७0 शेततळ्यांपैकी ४५ शेततळ्यांचे अनुदान शेतकर्यांना मिळाले नाही. शेततळय़ांचे २१ ते २२ लाख रुपये थकीत असून, सहा महिने झाले, तरी शेतकर्यांना पैसे मिळाले नाहीत. थकीत अनुदानासाठी पाठपुरावा सुरू आहे. आता दिवाळीपूर्वी तरी शेततळ्याचे अनुदान मिळते का, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
बाळापूर तालुक्यातील ४५ शेततळय़ांच्या थकीत अनुदानासाठी पाठपुरावा सुरू आहे. अनुदान प्राप्त होताच शेतकर्यांना तत्काळ वितरित करण्यात येईल. यावर्षी पाऊस कमी प्रमाणात असल्याने शेततळ्यात पाणी साचले नाही.
- गावित, कृषी सहायक, हातरुण.
-