अकोट परिसरात मुलींची विक्री करणारे रॅकेट सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 02:08 PM2019-02-12T14:08:27+5:302019-02-12T14:08:49+5:30

अकोट: अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून आणून देहव्यापारात ढकलणे तसेच मुलींची परप्रांतात विक्री करणाऱ्यांचे मोठे रॅकेट असल्याचे अकोट शहर पोलिसांच्या तपासात उघडकीस येण्याची शक्यता आहे.

racket of girls selling in Akot area | अकोट परिसरात मुलींची विक्री करणारे रॅकेट सक्रिय

अकोट परिसरात मुलींची विक्री करणारे रॅकेट सक्रिय

googlenewsNext

अकोट: अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून आणून देहव्यापारात ढकलणे तसेच मुलींची परप्रांतात विक्री करणाऱ्यांचे मोठे रॅकेट असल्याचे अकोट शहर पोलिसांच्या तपासात उघडकीस येण्याची शक्यता आहे. परप्रांतातून पळवून आणलेल्या मुलीचा विक्री प्रयत्न करणाºया दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत अकोट येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने १३ फेब्रुवारीपर्यंत वाढ केली आहे.
अकोट शहर पोलिसांनी सदर प्रकरण गांभीर्याने घेतले असून, तपासामध्ये मुलींची विक्री व देहव्यापारात ढकलणारे मोठे रॅकेट समोर येत आहे. या घटनेतील आरोपींनी आतापर्यंत चार मुलींना फूस लावून पळवून आणून देहव्यापारात ढकलले. शिवाय या मुलींचा गैरफायदा घेऊन या रॅकेटमध्ये सहभागी असणाºयांनी त्यांच्याकडून देहव्यापार करून घेतल्याची माहिती पुढे येत आहे. आरोपी मो. सद्दाम शहाबुद्दीन सद्दाम याने यापूर्वीसुद्धा आजमगढ भागातील एका मुलीला लग्नाचे आमिष देऊन पळवुन आणून वेश्या व्यवसायात गुंतवून ठेवले. केवळ परप्रांतातील मुली पळवून आणून त्यांना देहव्यापारात गुंतवून ठेवणे इतपत हे रॅकेट नसून, या रॅकेटमधे सहभागी आरोपींनी अकोट तालुक्यातील दोन मुलींना राजस्थान व मध्य प्रदेशात विक्री केल्याची गंभीर माहिती समोर येत आहे. त्यामुळे देहव्यापारात गुंतलेले फार मोठे रॅकेट अकोट परिसरात असल्याने पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. विशेषत: अकोट परिसरातच या मुलींची खरेदी-विक्रीचा व्यापार कशा पद्धतीने होतो. व्यापाराकरिता आरोपींनी अकोट शहराचीच निवड का केली असावी, या भागातील किती मुलींची विक्री केली असावी, तसेच या भागात परप्रांतातून जबरदस्तीने किती मुली आणल्या असाव्यात, असा तपासाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणाचा तपास अकोट उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील सोनवणे, पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गवई करीत आहेत.

दोन आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ
अकोट शहर पोलीस स्टेशनला ६ जानेवारी रोजी दाखल झालेल्या फिर्यादीमध्ये एका १७ वर्षीय मुलीला आरोपी मो. सद्दाम शहाबुद्दीन सद्दाम याने पळवून आणले होते. तिच्यावर दोन वेळा जबरदस्तीने संबंध प्रस्तापित केले. या प्रकरणी त्याला राजा ऊर्फ राजेश तुळशीराम काळमेघ, आजाद खान ऊर्फ जुनेद खान ऊर्फ जमीर खान, दीपा ऊर्फ रेशमा खान आजाद खान यांनी अमीनपुरा परिसरातील घरात मुक्कामी ठेवण्याकरिता सहकार्य करीत देहव्यापाराकरिता विक्री करण्याच्या प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले. त्यापैकी मो. सद्दाम शहाबुद्दीन सद्दाम, आजाद खान ऊर्फ जुनेद खान ऊर्फ जमीर खान या दोघांना अटक करून ११ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली होती. या दोन आरोपींची पोलीस कोठडी संपल्याने त्यांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले करून पोलिसांनी वाढीव कोठडीची मागणी केली. तसेच सरकारी वकील अजित देशमुख यांनी युक्तिवाद केला असता न्यायाधीश मनीष गणोरकर यांनी आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली.
 

देहव्यापार व मुलींची विक्री प्रकरणाचा गांभीर्याने तपास करण्यात येत आहे. यामध्ये आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
- संतोष महल्ले, पोलीस निरीक्षक
अकोट शहर पोलीस स्टेशन

 

Web Title: racket of girls selling in Akot area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.