लाचखोर हेड कॉन्स्टेबल गजाआड
By admin | Published: July 7, 2015 01:41 AM2015-07-07T01:41:45+5:302015-07-07T01:41:45+5:30
पोलीस कारवाई टाळण्यासाठी मागितले होते ५0 हजार रुपये.
अकोला : पतीने पत्नी व तिच्या माहेरकडील नातेवाईकांविरुद्ध दिलेल्या तक्रारीनुसार, पोलीस कारवाई न करण्यासाठी विवाहितेला ५0 हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणार्या सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यातील पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र रूपणे याच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. मूर्तिजापूर तालुक्यातील एका विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार, गत महिन्यात तिच्या पतीने तिच्या व माहेरकडील नातेवाईकांविरुद्ध कौटुंबिक वादातून मूर्तिजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीची चौकशी मूर्तिजापूर पोलीस ठाण्यातील तत्कालीन हेड कॉन्स्टेबल महेंद्र रूपणे यांच्याकडे देण्यात आली. विवाहिता व तिच्या नातेवाईकांविरुद्ध पोलीस कारवाई न करण्यासाठी महेंद्र रूपणे यांनी तिला ५0 हजार रुपयांची लाच मागितली. दरम्यान, रूपणे यांची सिव्हिल लाइन पोलीस ठाण्यात बदली झाली. त्यानंतरही रूपणे हे विवाहितेला लाचेची मागणी करीत होते. विवाहिता व हेड कॉन्स्टेबल रूपणे यांच्यात चर्चा झाली आणि चर्चेनंतर १0 हजार रुपये देण्याचे ठरले. १५ जून २0१५ रोजी विवाहितेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रूपणे यांची तक्रार केली. १६ जूनला रूपणे यांना अकोल्यातील नवीन बसस्थानकावर पैसे देण्याचे ठरले. दरम्यान, याठिकाणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्यांनी सापळा रचला होता. रूपणे हे बसस्थानकावर आले. तक्रारकर्त्या विवाहितेस भेटले आणि विवाहितेला बसस्थानकाच्या कॅन्टीनमध्ये बसण्यास सांगून मोटारसायकल पार्किंगमध्ये लावण्याचे सांगून बाहेर गेले. रूपणे यांना संशय आल्याने ते पुन्हा परत आले नाही. परंतु रूपणे यांच्याविरुद्धच्या तक्रारीची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी व तपास केला. हेड कॉन्स्टेबल महेंद्र रूपणे यांच्याविरुद्ध सोमवारी कोतवाली पोलीस ठाण्यात कलम ७ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली. मंगळवारी रूपणे यांना न्यायालयात हजर करण्यात येईल.