‘जीएमसी’मध्ये रॅगिंंग: तीन विद्यार्थिनींना प्रत्येकी २५ हजारांचा दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 10:57 AM2019-12-13T10:57:07+5:302019-12-13T11:42:02+5:30

विद्यार्थिनीला मानसिक त्रास झाल्याबद्दल तिन्ही दोषी विद्यार्थिनींवर प्रत्येकी २५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Ragging in 'GMC': Three students fined 25,000 each! | ‘जीएमसी’मध्ये रॅगिंंग: तीन विद्यार्थिनींना प्रत्येकी २५ हजारांचा दंड!

‘जीएमसी’मध्ये रॅगिंंग: तीन विद्यार्थिनींना प्रत्येकी २५ हजारांचा दंड!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रसूती व स्त्री रोगशास्त्र विभागातील बहुचर्चित रॅगिंग प्रकरणी गुरुवारी अ‍ॅन्टी रॅगिंग समितीची अंतिम बैठक पार पडली. बैठकीत सादर अहवालानुसार, तक्रारकर्त्या विद्यार्थिनीला मानसिक त्रास झाल्याबद्दल तिन्ही दोषी विद्यार्थिनींवर प्रत्येकी २५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली.
उच्चस्तरीय समितीने चौकशी अहवाल वैद्यकीय संचालकांकडे सादर केल्यानंतर ७ नोव्हेंबर रोजी झालेल्या अ‍ॅन्टी रॅगिंग समितीच्या महत्त्वाच्या बैठकीत तिन्ही विद्यार्थिनींना रॅगिंग प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर झालेल्या चौकशीच्या आधारे अधिष्ठाता डॉ. शिवहरी घोरपडे यांनी गुरुवार, १२ डिसेंबर रोजी अ‍ॅन्टी रॅगिंग समितीच्या बैठकीत अंतिम अहवाल सादर केला. त्यानुसार, तक्रारकर्त्या विद्यार्थिनीला केलेले आरोप सिद्ध करता आले नाही; परंतु कामाच्या वेळी झालेल्या वादातून तिला मानसिक त्रास झाल्याची बाब समोर आली. त्यामुळे तिन्ही वरिष्ठ विद्यार्थिनींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. शिवाय, यानंतर पीडित विद्यार्थिनीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असाही समज तिन्ही विद्यार्थिनींना देण्यात आला.


प्रकरण पुन्हा न्यायालयात जाण्याची शक्यता

अ‍ॅन्टी रॅगिंग समितीच्या बैठकीनंतर हे प्रकरण येथेच समाप्त करण्यात आले आहे; मात्र या चौकशीतून न्याय न मिळाल्याने तक्रारकर्ता विद्यार्थिनी पुन्हा न्यायालयात जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


रॅगिंग झालीच नाही?
सूत्रांच्या माहितीनुसार, १५ फेब्रुवारी २०१९ रोजी तक्रारकर्ता विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. उपचारादरम्यान, विद्यार्थिनीवर रॅगिंग झाल्याची तक्रार पालक व पीडित विद्यार्थिनीने तत्कालीन अधिष्ठाता यांच्याकडे केली होती. त्यावेळी हे प्रकरण आपसात मिटविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे याप्रकरणी पोलिसांतदेखील तक्रार करण्यात आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली; परंतु अहवालानुसार रॅगिंग झालीच नाही, तर तक्रारकर्त्या विद्यार्थिनीने आत्महत्येचा प्रयत्न का केला, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे.

रॅगिंग प्रकरणी गुरुवारी अन्टी रॅगिंग कमिटीची अंतिम व महत्त्वपूर्ण बैठक झाली. चौकशीदरम्यान, कामाच्या वादातून तक्रारकर्त्या विद्यार्थिनीला त्रास झाल्याचे आढळले; परंतु त्याला रॅगिंग म्हणता येणार नाही. त्यामुळे तिन्ही वरिष्ठ विद्यार्थिनींवर प्रत्येकी २५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली. शिवाय, यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला त्रास होणार नाही, याबाबत सर्वांनाच समज देण्यात आला.
- डॉ. शिवहरी घोरपडे, अधिष्ठाता, जीएमसी.

Web Title: Ragging in 'GMC': Three students fined 25,000 each!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.