‘ओबीसीं’च्या प्रश्नांवर राहुल गांधींची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 04:04 AM2017-07-24T04:04:57+5:302017-07-24T04:04:57+5:30
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देशभरातील विविध समुदायांसोबत सध्या बैठकांचे सत्र सुरू केले आहे. यामध्येच इतर
राजेश शेगोकार/लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी देशभरातील विविध समुदायांसोबत सध्या बैठकांचे सत्र सुरू केले आहे. यामध्येच इतर मागासवर्गीय घटकांच्या समस्या व त्यांच्यासमोर असणाऱ्या प्रश्नांची माहिती घेण्यासाठी प्रत्येक राज्यातील निवडक नेत्यांसोबत राहुल गांधी हे स्वत: चर्चा करीत असून, २२ जुलै रोजी महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. या संवादासाठी निवडलेल्या राज्यातील २४ प्रतिनिधी पश्चिम वऱ्हाडातील दोन आमदारांसह पदाधिकाऱ्यांचाही समावेश होता.
केंद्रातील काँग्रेसची सत्ता गेल्यानंतर राज्यातील काँग्रेस पक्षाला सत्ता गमवावी लागली. त्यामुळे हतबल झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पुन्हा नवी उमेद देण्यासाठी विविध प्रश्नांवर काँग्रेस पक्ष आक्रमक भूमिका घेत आहे. विरोधी पक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडतानाच समाजातील विविध घटकांसोबत संवाद असावा, त्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेत त्यादृष्टीने पक्षाची रणनीती ठरविण्यासाठी काँग्रेस पक्ष कामाला लागला आहे. पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे स्वत: पुढाकार घेत असून, त्यामधूनच समाजाच्या विविध घटकांमधील पदाधिकाऱ्यांसोबत संवादाची प्रक्रिया सुरू झाली आहे. २२ जुलै रोजी दिल्ली येथे ‘ओबीसीं’ संदर्भात झालेल्या बैठकीत खासदार राजीव सातव, विजय वडेट्टीवार, बुलडाणा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आमदार राहुल बोंद्रे, आमदार अमित झनक, अकोल्याचे प्रकाश तायडे यांच्यासह अलका राठोड, रमेश राख आदी २४ प्रतिनिधींचा समावेश होता.
काँग्रेस पक्षाने ‘मला कर्जमाफी मिळालीच नाही’, असे आंदोलन सुरू केले असून, त्याद्वारे कर्जमाफीमधील फसवेगिरी समोर आणण्याचा प्रयत्न सुरू केला असल्याचेही नेत्यांनी सांगितले. ओबीसींच्या न्यायासाठी काँग्रेसने रस्त्यावर उतरले पाहिजे, असे निर्देश राहुल यांनी दिले.