कोचिंग क्लासेसवर छापेमारी
By admin | Published: January 24, 2017 02:30 AM2017-01-24T02:30:11+5:302017-01-24T02:30:11+5:30
दोन क्लासेसची झाडाझडती; आयकर खात्याची कारवाई.
अकोला, दि. २३- नागपूर येथील आयकर खात्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाने गत आठवड्यात अकोल्यातील तीन बड्या सराफा प्रतिष्ठानांवर छापे घातल्याच्या पाठोपाठ सोमवारी सकाळीच अकोल्यातील दोन नामांकित कोचिंग क्लासेसवर छापे मारण्यात आले. आयकर अधिकार्यांनी दोन्ही शिकवणी वर्गांच्या दस्तावेजांची तपासणी सुरू केली असून, त्यांच्या व्यवहारांचीही झाडाझडती घेण्यात येत आहे.
नोटाबंदीनंतर बँक खात्यांमध्य़े झालेली मोठय़ा रकमांची उलाढाल आणि शेती, भूखंड व घरांच्या खरेदी-विक्रीच्या मोठय़ा व्यवहारांच्या संशयावरून, आयकर खात्याने आता अकोल्यातील नामांकित आणि बड्या कोचिंग क्लासेसची झाडाझडती सुरू केली आहे. सोमवारी अकोला आणि खामगाव येथील आयकर खात्याच्या अधिकार्यांनी दोन क्लासेसच्या कार्यालयाची तपासणी केली. सोमवारी रात्री उशिरापर्यंत आयकर खात्याच्या अधिकार्यांकडून क्लासेसच्या दस्तावेजांची तपासणी करणे सुरूच होते.
'सर्वेक्षण असल्याचे सांगा !'
क्लासेसवर आयकर खात्याची छापेमारी सुरु असताना माध्यमांचे प्रतिनिधी पोहोचल्यानंतर, क्लासेसच्या संचालकांनी आयकर खात्याच्या अधिकार्यांना माध्यमांना माहिती देताना सर्वेक्षण सुरू असल्याचे सांगा, अशी विनंती केली; मात्र अधिकार्यांनी त्यास नकार दिला. छापेमारी करण्यात आली असून, झडती घेण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
व्यवहारांची तपासणी
या दोन्ही क्लासेसमध्ये नोंदणीकृत किती विद्यार्थी आहेत, याचाही शोध घेण्यात येत आहे. दोन्ही क्लासेसच्या संचालकांचे व्यवहार संशयाच्या भोवर्यात असल्यामुळे ही छापेमारी झाल्याची माहिती, सूत्रांनी दिली. या छापेमारीतील तपासणी पूर्ण झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती आहे.