चार जुगार अड्ड्यांवर छापे; १३ जणांना अटक!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 11:17 AM2021-06-06T11:17:22+5:302021-06-06T11:17:59+5:30
Akola Crime News : कारवाईत पोलिसांनी ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोला : जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाने शनिवारी शहरातील कृषिनगर, न्यू तापडियानगर, रामदास मठ अकोट फैल, तपे हनुमान मंदिर येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर धाडसत्र राबवित १३ जणांना अटक केली. कारवाईत पोलिसांनी ६८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष पथक गुन्हे शोधकामी पेट्रोलिंग करत असताना काही लोक वरली जुगारावर खायवाडी व लागवडी करून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पथकातील कर्मचाऱ्यांनी सिव्हिल लाइन्स पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोद्दार स्कूल कृषिनगर येथे दोन व्यक्तींना वरली जुगारावर खायवडी व लागवडी करताना अटक केली. त्यांच्याकडून २ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दुसरी कारवाई न्यू तापडियानगर येथे करण्यात आली. या ठिकाणी दोन व्यक्ती वरली जुगारावर खायवाडी व लागवडी करून जुगार खेळत होते. त्यांना अटक करून त्यांच्या जवळून २ हजार ४६० रुपयांसह दहा हजार रुपयांचा एक मोबाइल असा एकूण १४ हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तिसरी कारवाई पोलीस स्टेशन अकोट फाइल येथील रामदास मठाजवळ करण्यात आली. या ठिकाणी दोन जण जुगार खेळत होते. त्यांच्याकडून एकूण ९३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चौथी कारवाई रामदास पेठ पोलीस स्टेशन हद्दीतील तपे हनुमान मंदिराजवळ करण्यात आली. या ठिकाणी पाच जण जुगार खेळत होते. त्यांच्या जवळून ४० हजारांची एक मोटारसायकल, १० हजारांचा एक मोबाइल व रोख १ हजार ५०० रुपये असा एकूण ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या चारही कारवायांमध्ये पोलिसांनी १३ जणांविरोधात महाराष्ट्र जुगारबंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले असून, एकूण ६८ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.