जिल्ह्यात छापेमारी; ४४ गाेवंश तस्करांच्या मुसक्या आवळल्या; १७ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत उभारले हाेते चेकनाके
By आशीष गावंडे | Published: June 17, 2024 10:49 PM2024-06-17T22:49:01+5:302024-06-17T22:49:09+5:30
पुरेसा पाऊस हाेताच शेतकरी वर्गात पेरणीची लगबग सुरु हाेते. ही बाब हेरुन गाेवंश तस्कर डाेके वर काढतात.
अकाेला: शेतकऱ्यांचे गाेधन चाेरीला जात असल्याच्या घटनांची गंभीर दखल घेत जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांच्या निर्देशानुसार बकरी इदच्या पृष्ठभूमिवर जिल्हाभरात छापेमारी करुन तब्बल ४४ गाेवंश तस्करांना अटक करण्यात आली आहे. यादरम्यान, २० गाेवंशांना जीवनदान मिळाले असून या कारवाइसाठी १७ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत तात्पुरते २७ चेक नाके उभारण्यात आले हाेते,हे विशेष.
पुरेसा पाऊस हाेताच शेतकरी वर्गात पेरणीची लगबग सुरु हाेते. ही बाब हेरुन गाेवंश तस्कर डाेके वर काढतात. शेतकऱ्यांचे गाेधन चाेरुन त्यांची निर्दयतेने कत्तल हाेत असल्याचे पाहता जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी जिल्हाभरातील पाेलिस यंत्रणेला गाेवंश तस्करांना हुडकून काढत त्यांना बेड्या ठाेकण्याचे निर्देश दिले हाेते. त्यानुषंगाने १७ पाेलिस ठाण्यांच्या हद्दीत तात्पुरत्या स्वरुपाचे चेक नाके उभारण्यात आले.
मागील १७ दिवसांच्या कालावधीत अवैधरित्या गोवंशाची निर्दयतेने वाहतुक करुन त्यांची कत्तल करणाऱ्या तस्करांना पकडण्याची माेहीम राबविण्यात आली. यामध्ये जिल्हाभरात ४० केसेस दाखल केल्या असून ४४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. कारवाइ दरम्यान, २० गोवंशांना जीवनदान देण्यात आले. पाेलिसांनी चार वाहनासह १४ लक्ष ४९ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पाच महिन्यांत १०४ तस्करांना बेड्या
बच्चन सिंह यांनी १ जानेवारी राेजी जिल्हा पाेलिस अधीक्षक पदाची सुत्रे स्वीकारल्यानंतर त्यांनी पहिल्याच क्राइम मिटींगमध्ये गाेवंश तस्करीला समुळ उखडून टाकण्याचे निर्देश दिले हाेते. मागील पाच महिन्यांच्या कालावधीत याप्रकरणी शहरासह जिल्ह्यातील पाेलिस ठाण्यांत ८५ गुन्हे दाखल करण्यात येऊन १०४ तस्करांना अटक करण्यात आली आहे. तसेच तस्करांकडून तब्बल ९६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
कारवाइला गती देण्याची सूचना
गाेधन चाेरीला जात असल्याने शेतकरी वर्ग मानसिकरित्या खचून जाताे. वाहनात गाेवंशांना काेंबून त्यांची कत्तल करणाऱ्या तस्करांना पकडण्याच्या कारवाइला गती देण्याची सूचना जिल्हा पाेलिस अधीक्षक सिंह यांनी पाेलिस यंत्रणेला दिली आहे.