प्रवाशांच्या मूलभूत सेवांकडे रेल्वे प्रशासनाची डोळेझाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 02:18 PM2019-06-22T14:18:10+5:302019-06-22T14:19:45+5:30
अकोला : अकोला रेल्वे स्थानकावरील मूलभूत सेवांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांची कोंडी होत आहे.
अकोला : अकोला रेल्वे स्थानकावरील मूलभूत सेवांकडे रेल्वे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने प्रवाशांची कोंडी होत आहे. रेल्वे प्रशासनाने त्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
रेल्वे स्थानकावरील नवीन फूट ओव्हर ब्रीजचे काम असल्याने येथे प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरील शौचालय पाडण्यात आले आहे. या प्लॅटफॉर्मच्या पश्चिम दिशेत नवीन शौचालय बांधण्यात आले; मात्र त्यासंदर्भात सूचना नसल्याने प्रवाशांची कोंडी होत आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळातील अकोला गणमान्य स्थानकापैकी एक आहे. त्यात अधिक प्रगती म्हणून येथे रेल्वे ओव्हर फुटब्रीजचे बांधकाम सुरू झाले आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक एकपासून सुरू होणारा हा नवीन फु ट ओव्हर ब्रीज प्लॅटफॉर्म क्रमांक पाचपर्यंत विस्तारला जाणार आहे. प्रवाशांच्या सुविधेसाठी होत असलेल्या या ब्रीजच्या बांधकामामुळे मात्र पूर्वीचे शौचालय तोडण्यात आले आहे.
प्लॅटफॉर्म ४-५ वरील शौचालयास कुलूप
दक्षिण-मध्य रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ४-५ वरील पश्चिम दिशेत शौचालय तयार आहे; मात्र त्याला नेहमी कुलूप लागलेले असते. त्यामुळे प्रवाशांना त्याचा लाभ घेता येत नाही. प्रवाशांना सुविधा द्यायच्या नसतील तर त्याचे बांधकाम तरी कशासाठी केले, असा प्रश्न प्रवाशांकडून उपस्थित होत आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर बदलली जातेय फरशी
अकोला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक-२ वरील फरशी बदलली जात आहे. त्यामुळे अकोला स्थानकावर येणाऱ्या मुंबईसह पुणे, अहमदाबाद, कोल्हापूर गाड्यांना काही अंतरावर थांबविले जात आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. हे काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणीही केली जात आहे.